माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी  यांचे निधन   

0
1218

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय. ९३) यांचे  आज (गुरूवार) सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी  यांच्यावर  ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या किडनीला संसर्ग झाला होता. अखेर त्यांची एम्स् रूग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.  वाजपेयींच्या निधनामुळे अवघा देश हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील तारा ढगाआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

वाजपेयींना ११ जूनला किडनीच्या आजारामुळे एम्समध्ये दाखल केले होते. वाजपेयी २००९ सालापासूनच आजारी आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता. तसेच ते डिमेंशिया आजाराने त्रस्त होते. त्यांना मूत्र संसर्ग झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते.

वाजपेयी यांच्यावर किडनी संसर्ग, छातीदुखी, मूत्र संसर्ग या आजारावर गेल्या ६६ दिवसांपासून उपचार सुरु होते. याशिवाय त्यांना मधुमेहही होता. शिवाय त्यांची एकच किडनी काम करत होती. २००९ मध्ये त्यांना स्मृतीभ्रंशाचा झटका आला होता.

कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेले अटलबिहारी वाजपेयी यांनी तीनवेळा भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. पहिल्यांदा १९९६ मध्ये ते पंतप्रधान झाले. त्यानंतर १९९८ आणि १९९९ ते २००४ या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. ते उत्त्म संसदपटू होते. त्यांच्या संसदेतील भाषणाचे दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कौतुक केले होते. वाजपेयी यांनी पत्रकार, कवी, लेखक अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटविला होता.

काश्मीरमध्ये परमिट सिस्टम लागू करण्यात आली. त्यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत पत्रकार म्हणून वाजपेयी काश्मीरला गेले होते. वाजपेयींनी कवी, लेखक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मोदी सरकारने २०१५ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केले होते.