माघी एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी सजले विठ्ठल मंदिर

0
370

पंढरपूर, दि.५ (पीसीबी) – माघी एकादशी निमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात नित्यपूजा पार पडली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्नीक तर रुक्मिणीमातेची पूजा समितीचे लेखा अधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते पार पडली. यानिमित्त मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गर्भगृह, प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक आरास केली आहे. पुण्यातील मोरया ग्रुपतर्फे ही फुलांची आरास करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

माघी एकादशीनिमित्त विठुरायाचा जयघोष आणि टाळ-मृदूंगाच्या वादनाने अवघी पांढरी दुमदुमून निघाली आहे. वारकरी संप्रदायासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या माघ वारीसाठी कोकण, मराठवाडा, बेळगाव आदी ठिकाणाहून भाविक दरवर्षी येत असतात. यंदा या वारीसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. आज पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाची नित्यपूजा पार पडली. यानिमित्त मंदिराला झेंडू, शेवंती, स्पिंगर आणि जरबेरा या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या कामी जवळपास २०० किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.