महिलेने दिला पाच बालकांना जन्म…

0
182

देश,दि.२३(पीसीबी) – झारखंडमधील रांची येथील एका महिलेने तब्बल पाच मुलांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. रांची येथील रीम्स हॉस्पिटलमध्ये या महिलेची प्रसूती झाली असून रीम्सने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर या पाच मुलांचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. या मुलांची आई आणि मुलं निरोगी असल्याची माहिती असून हे बाळं एनआयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती आहे.अधिक माहितीनुसार, रीम्स हॉस्पिटलने ट्वीटरवर टाकलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, “इटखोरी चतरा येथील एका महिलेने पाच मुलांना जन्म दिला आहे. डॉ. शशी यांच्या नेतृत्वाखाली प्रसूती झाली. मुले NICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सर्व नवजात बालकांना निओनॅटोलॉजी विभागात दाखल केले असून या मुलांचे वजन सामान्यपेक्षा खूपच कमी आहे.

या मुलांची आई इटखोरी, चतरा येथील रहिवासी असून आई आणि मुले दोघेही चांगले आहेत. डॉक्टरांचे पथक आई आणि मुलांवर लक्ष ठेवून आहे.” असं रीम्सने म्हटलं आहे.

या चिमुकल्याचे वजन केवळ एक किलो ते ७५० ग्रॅम असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर याआधीही एका महिन्यापूर्वी एका महिलेने ४ मुलांना जन्म दिला होता. त्या महिलेची सर्व मुले निरोगी होती, त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. या महिलेची ही पाच मुलेसुद्धा निरोगी असून त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येईल अशी माहिती हॉस्पिटलने दिली आहे.