महाळुंगे पोलीस चौकीतील विविध कक्ष, व्यायामशाळेचे उदघाटन

0
312

चाकण, दि. १ (पीसीबी) – महाळुंगे पोलीस चौकीत नव्याने पोलीस अधिकारी, अंमलदार, महिला कक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच आधुनिक व्यायामशाळा देखील बनविण्यात आली आहे. विविध कक्ष आणि व्यायामशाळेचे उदघाटन खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते बुधवारी (दि. 1) झाले.

उदघाटन प्रसंगी उपायुक्त मंचक इप्पर, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, अशोक रजपूत, मोहन शिंदे, ज्ञानेश्वर साबळे, दशरथ वाघमोडे, विविध कंपन्यांचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते.

चाकण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत महाळुंगे पोलीस चौकी नव्याने उभारण्यात आली आहे. अडगळीच्या खोलीप्रमाणे वाटणारी चौकीला आता पोलीस ठाण्याचे रूप आले आहे. त्यातच महाळुंगे पोलीस चौकीसह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस चौक्यांचे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आले आहेत. त्या धर्तीवर महाळुंगे पोलीस चौकीचा विकास सुरु आहे. महाळुंगे परिसरातील विविध कंपन्या, उद्योजक, संस्था आणि नागरिकांच्या मदतीने पोलीस चौकीमध्ये विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पोलीस चौकीत काम करणा-या महिला पोलिसांसाठी महिला अंमलदार कक्ष बनवण्यात आला आहे. तर पुरुष कर्मचा-यांसाठी देखील स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. सोबतच पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने आधुनिक व्यायामशाळा देखील बनविण्यात आली आहे. याचे उदघाटन बुधवारी करण्यात आले.

उदघाटन प्रसंगी बोलताना आमदार दिलीपराव मोहिते पाटील म्हणाले, “मागील काही वर्षात कारखानदारी सुरू झाली. त्यासोबत गुन्हेगारी टोळ्याही तयार झाल्या. त्यांचा बिमोड करण्यासाठी म्हाळुंगे पोलीस चौकी तयार केली. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी चौकी पाहिली आहे. पाहिले आयुक्त पद्मनाभन यांनी या चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न केला. खराबवाडी हे गाव चाकण जवळ असताना ते महाळुंगे चौकीत टाकण्यात आले आहे. सुदुंबरे गावचा वावर खेड तालुक्यात आहे. मात्र ते गाव तळेगाव हद्दीत समाविष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना सोयीची, जवळची होतील अशा पद्धतीने त्यांचा संबंधित पोलीस ठाण्यात समावेश व्हायला हवा. चाकण मधील तळेगाव चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे-नाशिक मार्गावर एक-दोन ठिकाणी सिग्नल वाढवावे, अशी सूचना देखील आमदार मोहिते पाटील यांनी केली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘कोणती गावे कोणत्या पोलीस ठाण्याच्या जवळ आहेत त्याची पाहणी करून त्याचा प्रस्ताव करा. काही गावे एमआयडीसी परिसरात नाहीत पण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत, अशा गावांसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार करावा. आमदार दिलीप मोहिते पाटील आणि मी स्वतः राज्य शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू. पोलीस नागरिकांपासून वेगळे नाहीत. नागरिकांनी पोलिसांचा सन्मान केला तर पोलीसही नागरिकांचा सन्मान करतील. पोलिसांमध्ये संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. लोककल्याणकारी राज्य तयार करण्यासाठी ते आवश्यक आहे. समाजातील गुन्हेगारी ही कॅन्सरसारखी आहे. ज्याप्रमाणे डॉक्टरांना कॅन्सरसोबत कायम लढावे लागते. त्याचप्रमाणे पोलिसांना समाजातील गुन्हेगारीच्या कॅन्सर सोबत कायम लढावे लागते. पोलीस जे करतात ते समाजासाठी करतात. समाजासाठी काम करत असताना पोलिसांना समाजासोबत वाईटपणा घ्यावा लागतो. सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

ज्यांनी पोलीस चौकीच्या प्रगतीसाठी मदत केली त्या सर्वांचे आभार मानत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एमआयडीसी परिसरात जे घरचे भेदी आहेत त्यांना शोधून काढण्यासाठी प्रयत्न करणार. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत मिळून कंपनीतील भंगार, कॅन्टीन अशी कंत्राटे घेत असतील तर अशांना शोधून त्यावर पोलीस कारवाई करतील. नागरिकांनी तक्रार द्यावी, त्यावर कारवाई होईल असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी नागरिकांना दिले.

उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, ‘अरविंद पवार यांनी विशेष लक्ष घालून महाळुंगे चौकीचा विकास केला आहे. फार कमी अधिकाऱ्यांना असे काम करण्याचा योग येतो. एमआयडीसी परिसरातील वेगवेगळी आव्हाने असतात. त्यावर पोलीस काम करत असतात. औद्योगिक वसाहत वाढविण्यासाठी काही घटक मारक असतात. इथली औद्योगिक वसाहत वाढविण्यासाठी भयमुक्त वातावरण करणे आवश्यक असल्याने पोलीस पुढाकार घेऊन भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता लोकांना, औद्योगिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे भय वाटत नाही. त्यांना काही अडचण आल्यास ते लगेच पोलिसांना सांगतात. यापूर्वी लोक पोलिसांकडे येण्यास, तक्रार देण्यास घाबरत होते. चाकण, महाळुंगे परिसर भारताचे डेट्रॉईट म्हणून पुढे येईल, अशी अपेक्षा देखील उपायुक्तांनी व्यक्त केली.

महाळुंगे चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, ‘संतांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे. मागील काही वर्षात महाळुंगे परिसरात इंडस्ट्री वाढली. त्यासोबतच चोरी, दरोडे, खंडणी असे गुन्हे देखील वाढले आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांनी पदभार घेतला. त्यांनी महाळुंगे चौकीची जबाबदारी माझ्याकडे दिली. 50 कर्मचारी 10 अधिकारी यांना घेऊन आम्ही चौकीचे काम सुरू केले. आजवर 500 पेक्षा अधिक लुटारूंना जेरबंद करण्यात आम्हाला यश आले आहे.

काही गुन्हेगारांकडे पाहून वाईट वाटते. वेळीच मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक जणांवर गुन्हेगारीचा शिक्का लागला आहे. अनेकांना जेलची हवा खावी लागली. तर काहीजण कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. या मुलांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. गुन्हेगारी कडे वळणाऱ्या, भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी व्यायामशाळा, अभ्यासिका सुरू करा. मनोबल वाढविण्यासाठी सर्व पोलीस पाटील आणि नागरिकांनी प्रयत्न करावे. पोलीस नागरिकांच्या सोबत आहेत. महाळुंगे पोलीस चौकी सुधारण्यासाठी परिसरातील कंपनी प्रतिनिधींनी मोलाचे प्रयत्न केले. त्यातूनच व्यायामशाळा, महिला कक्ष, अधिकारी कक्ष सुरू केला आहे. अधिकारी दोन ते तीन वर्षांसाठी येतात. पण ही चौकी, हा परिसर कायम तुमचा आहे, असेही पोलीस निरीक्षक पवार म्हणाले.

पोलीस पाटील साहेबराव राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. राऊत म्हणाले, ‘2010 ला चाकण, महाळुंगे एमआयडीसीची सुरुवात झाली. परिसरात विकासगंगा वाहू लागली. त्याच प्रमाणात गुन्हेगारी वाढू लागली. या भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांची महत्वाची भूमिका आहे. पोलीस पाटील यांनी त्यांचे काम आणखी चांगल्या प्रकारे करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांनी एक कार्यशाळा घ्यावी.”

पोलीस पाटील तृप्ती मांडेकर म्हणाल्या, “प्रत्येक स्तरातील लोकांचा विचार करून महाळुंगे पोलीस चौकीचा विकास केला आहे. शिवजयंती, निवडणुका, रक्तदार शिबिर यांसारख्या उपक्रमात पोलीस आणि नागरिक हिरीरीने सहभाग घेत आहेत. पीडितांना न्याय देण्यासाठी पोलीस पाटील मदत करत आहेत. पोलीस ठाण्यात वाद न नेता ते स्थानिक पातळीवर मिटविण्यासाठी पोलीस पाटील म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. महाळुंगे चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी प्रस्तावना केली. पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी आभार मानले.