महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला, आता…

0
396

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा पेट घेताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या सीमेवरील मराठी भाषिकांची गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करावीत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. अजित पवारांनी पंतप्रधानांना या संबंधित एक पत्र लिहिलं आहे.

कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात येत आहे. मराठी भाषिकासंदर्भातील कर्नाटक सरकारची ही भूमिका अन्यायपूर्ण व मानवताविरोधी आहे. मराठी भाषिकांवर होणारा हा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या वतीने सीमाप्रश्नाची लढाई जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, याची खात्री आहे. सदर प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना लवकर न्याय द्यावा, असं देखील अजित पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली आहेत. तरी देखील बेळगाव, भालकी, निपाणी कारवार, बिदर या गावांसह सीमेवरील मराठी भाषिकांची अनेक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत. हीच गावे महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे.