महाराष्ट्राला लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळणार- आदित्य ठाकरे

0
435

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वरळीत पदयात्रा काढत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरेदेखील उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राला लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळेल असे सूचक विधान केले आहे.

शिवसेनेच्या काही नेत्यांनी उघडपणे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली आहे. पण आदित्य ठाकरे यांनी मात्र यावर बोलणे टाळले होते. पण प्रथमच आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री होण्यात आपल्याला रस असल्याचे अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटले की, “लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. सध्या लोकांना माझ्याकडून जशी अपेक्षा आहे त्याप्रमाणे मी त्यांची सेवा करणार”.

आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली तेव्हा उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे तसंच मुलगा तेजस ठाकरेसोबत उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नाही असे विचारले असता त्यांनी सांगितलं की, “जे आदित्यला आशिर्वाद देत आहेत त्या सर्वांचा मी ऋणी आहे”.