महाराष्ट्रात हायअलर्ट, ड्रोन हल्ल्याची शक्यता; सुरक्षादलांना लागला दहशतवाद्यांच्या कटाचा सुगावा

0
266

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांकडून आखला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय सुरक्षादलांना डार्क नेटवर शिजत असलेल्या या कटाचा नुकताच सुगावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी महाराष्ट्रात हायअलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र सायबर सेलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी प्रवृत्तीच्या व्यक्ती ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर चर्चा करत होते. टोर ब्राउझर हा डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज ट्रेस करता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. या डार्क नेटवर मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत संभाषण सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता राज्यातील सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला एकही ड्रोनविरोधी यंत्रणा अस्तित्वात नाही. ड्रोन हल्ल्यात २० किमी ते ३० किमी अंतरावरुनही हल्ला केला जाऊ शकतो. या हल्ल्याचा माग काढणेही सोपे नसते. त्यामुळे महाराष्ट्रात तातडीने ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्याची गरज आता बोलून दाखवली जाऊ लागली आहे.

यापूर्वी २०२० साली मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा सकाळच्या वेळेत अचानक खंडित झाला होता. अनेक तास उलटूनही मुंबईत वीज उपलब्ध नव्हती. या तांत्रिक बिघाडामागे सायबर हल्ला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. महाट्रान्सकोच्या सर्व्हरवर व्हायरसद्वारे हा सायबर हल्ला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रात सायबर सेलसाठी नोडल एजन्सीचा प्रकल्प आणला जाणार असल्याचे म्हटले होते. सायबर सिक्युरिटी नावाच्या या प्रकल्पासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

‘लोकल ट्रेनची यंत्रणा हॅक करुन अपघात घडवून आणले जाऊ शकतात’

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भविष्यात सायबर हल्ल्याचा धोकाही बोलून दाखवला. सायबर अटॅकर्स किती धोकादायक असू शकतात हे सांगायचं झालं तर, हे लोक ट्रेन सिग्नलिंग सिस्टिम हॅक करुन ट्रेन्सचे अपघात घडवून आणू शकतात. जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यात विष मिसळू शकतात, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.