महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते – एकनाथ खडसे

0
725

धुळे, दि. १७ (पीसीबी) – लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होतील, याविषयी संभ्रमाची स्थिती आहे. तरी महाराष्ट्रासंदर्भात तसा निर्णय होऊ शकतो, असा अंदाज  भाजपचे ज्येष्ठ  नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.  युती न करण्याबाबत शिवसेना टोकाची भूमिका घेणार नाही, असे वाटते. मात्र, त्या विषयी आताच काही ठामपणे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना बराच अवकाश आहे. तोपर्यंत भाजप- शिवसेनेची युती होते किंवा नाही, या निवडणुका एकत्रितपणे होणार की नाहीत याविषयी रंगतदार चर्चा आणि करमणूकही चालेल, असे एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “डरकाळी’ फोडत मुंबई, कल्याण- डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने सत्ता मिळविली म्हणून भाजपप्रणीत सरकार चालत नाही, असे थोडेच आहे. पक्षांत आपापसांत मतभेद असतात. पण अंतिमतः आपल्या हाती असलेली सत्ता दुसऱ्याला म्हणजे कॉंग्रेसला देऊन टाकायची का? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला विचारला. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तुल्यबळ ठरेल किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. रात्रीतून रोज समीकरणे बदलत असतात, असे त्यांनी  सांगितले.