“महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना झालेला कोरोना कोविड-१९ चा आहे की राजकीय?”

0
307

सिंधुदुर्ग, दि.२२ (पीसीबी) : “महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना 8 दिवसांमध्ये झालेला हा कोरोना कोविड-19 चा आहे की राजकीय कोरोना आहे?” असा सवाल भाजप नेते नितेश राणेंनी उपस्थित केलाय. शिवाय त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामना वरती सुद्धा खोचक टीका केली आहे.

“1 मार्चला अधिवेशन आहे आणि गेल्या 8 दिवसांमध्ये मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना 8 दिवसांमध्ये झालेला हा कोरोना कोविड-19 चा आहे की राजकीय कोरोना आहे? कारण येणाऱ्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे.” असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केलाय.

एवढंच नाही तर राणे पुढे म्हणाले कि, “आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले. त्यांना कधी आतापर्यंत कोरोना झाला नव्हता. तो बरोबर अधिवेशनाच्या आधी 8 दिवस झाला. छगन भुजबळांनाही नेमका आज सकाळी झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कुटुंब संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत झाला नव्हता, तो बरोबर 8 दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. मी WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे,” अस नितेश राणे न विसरता म्हणाले.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावरही सडकून टीका करताना राणे म्हणाले कि, “आता वेगळ्या प्रकारचा सामना आम्हाला वाचायला मिळतोय. बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचलाय. आता हा उद्धव ठाकरेंचा नवीन सामना मार्केटमध्ये येतोय. इथे हिंदूंना विरोध केला जातो. हिंदूंच्या सणांना विरोध केला जातोय. म्हणून असा सामना वाचायचा आम्ही कधीच सोडून दिलाय. हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केला आहे.”