महापौर, उपमहापौर निवडीवेळी श्रीपाद छिंदमला पोलीस संरक्षण  

0
1453

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान  करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याला अहमदनगरच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पोलीस  संरक्षण देण्यात  आले आहे.  त्याच्यासोबत दोन पोलीस कर्मचारी असतील. २८ डिसेंबरला  महापौरपद निवड प्रक्रिया होणार आहे. त्यावेळी पोलीस संरक्षण देण्याची मागणी  छिंदम यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पत्राद्वारे केली होती.  

शिवाजी महाराजांविषयी आणि शिवजयंती विषयी अपशब्द वापरणाऱ्या  छिंदम  याचा  भाजपने उप महापौर पदावरून हटवून त्याची पक्षातूनही  हकालपट्टी केली होती. त्यानंतर  नुकत्याच झालेल्या अहमदनगर महापालिका निवडणुकीत छिंदम यांने भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांचा पराभव केला होता. प्रभाग क्रमांक ९ क मधून श्रीपाद छिंदम यांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान, १२ डिसेंबररोजी   तडीपारीची मुदत संपल्यानंतर शहरात दाखल झाल्यानंतर छिंदम यांनी आपल्या कार्यालयात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.  तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचेही छिंदम यांने पूजन  करून अभिवादन केले होते.