“महापालिकेने अतिक्रमण केलेल्या पथारी, हातगाडीवाल्यांवर कडक कारवाई करावी”: व्यापा-यांची आग्रही मागणी 

0
322

पिंपरी, दि.०९ (पीसीबी) : भोसरीतील आळंदी रस्त्यावरील दुकानासमोर लावण्यात येत असलेल्या हातगाडी, पथारी विक्रेत्यांमुळे दुकानदारांना व्यवसाय करणे अवघड होत आहे. महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणावर दिखाऊपणाची कारवाई केली जाते. महापालिकेने अतिक्रमण केलेल्या पथारी, हातगाडीवाल्यांवर कडक कारवाई करावी अशी व्यापा-यांनी मागणी केली. याबाबत महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिका-यांना निवेदन दिले आहे. व्यापा-यांनी निवेदनात म्हटले आहे की, भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ वसली आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूला हातगाडीवाले व पथारीवाल्यांचेही अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. ग्राहकांना दुकानासमोर वाहने लावण्यासाठीही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.

महापालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी हातगाडीवाल्यांना फक्त तोंडी सांगतात. पाच ते दहा मिनिटांसाठी तात्पुरत्या स्वरुपात हटवितात. त्यानंतर पुन्हा पथारीवाले रस्त्यावर येऊन विक्री करतात. त्यामुळे आळंदी रस्त्यावरील हातगाडीवाले व पथारीवाल्यांनी केलेले अतिक्रमण काढून टाकावे. ठोस कारवाई करावी. जे दुकानदार आपल्या दुकानाबाहेर हातगाडी वाल्यांना थारा देतात. त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी व्यापा-यांनी केली.
दरम्यान, व्यापारी नाना वाळुंज म्हणाले, ”आळंदी रस्त्यावर हातगाडीवाले व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचा आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. या अतिक्रमणावर कायमस्वरुपी तोडगा काढावा”.