महापालिकेच्यावतीने पर्यावरण जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे “जलदिन” साजरा

0
190

‘जलयुक्त पिंपरी चिंचवड शहर’ उपक्रमांतर्गंत नदी स्वच्छता अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद.

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिका, पर्यावरण विभाग व स्मार्ट सिटीच्यावतीने ‘जलयुक्त पिंपरी चिंचवड शहर’ उपक्रमांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पर्यावरण जनजागृती व सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा या तिन्ही नद्यांच्या जलपूजनाने झाली. आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त् जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, श्रीकांत सवणे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी यांच्यामार्फत सुरु असलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, प्रगत मैलाशुद्धीकरण तंत्रज्ञान, पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना, पाण्याचे नवीन स्रोत, २४ बाय ७ पाणीपुरवठा, स्मार्ट वॉटर मीटर इत्यादी जल व्यवस्थापनाशी निगडित विषयांवर उपस्थितांना माहिती देण्यात आली. जल संवर्धनावर कार्यरत सामाजिक संस्थांचा परिचय व त्यांचे योगदान यावरही सादरीकरण करण्यात आले. प्रसंगी, या उपक्रमात सहभागी संस्थांना सन्मानपत्र व रोपे देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात नृत्य व संगीत युक्त ‘सरीता… प्रवाहिता’ या कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कलाश्री नृत्यशाळा ग्रुपने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने एक वेगळीच रंगत आणली. लयबद्ध नृत्य, नेत्रसुखद प्रकाश, श्रवणीय संगीत आणि स्टेजवरील स्क्रिनवर मनाला तजेला देणारे पाण्याची विविध रूपे पाहताना प्रेक्षक हरवून गेले. जल दिनाच्या औचित्यावर पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप मार्फत पाण्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेची घोषणा करण्यात आली.

तत्पूर्वी, सकाळी चिंचवड येथील मोरया गोसावी घाट परिसरात स्वच्छता अभियान राबवून जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. आयुक्त राजेश पाटील, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, श्रीकांत सवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. जलप्रतिज्ञा घेवून अभियानाला सुरुवात झाली. जागतिक जलदिनानिमीत्त् ब क्षेत्रिय कार्यालय आरोग्य विभाग, संस्कार प्रतिष्ठान आणि विविध संस्था, डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, पर्यावरण प्रेमींनी या अभियानात सहभाग घेतला. मोरया गोसावी मंदिर परिसर व नदी पात्रातील जलपर्णी, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टीकचे ग्लास, विविध भंगलेल्या फोटो फ्रेम आणि विविध प्रकारचा असा ४ ते ५ टन कचरा याप्रसंगी संकलीत करण्यात आला. या अभियानाला नागरिक व सामाजिक संघटनांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.