जिजामाता, थेरगाव रुग्णालयाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

0
360

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले थेरगाव येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि  पिंपरीतील जिजामाता रुग्णालय चोवीस तास सुरु झाले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी या रुग्णालयाची आज (बुधवारी) पाहणी केली. थेरगाव, जिजामाता रुग्णालयात वैद्यकीय सेवा कशा पद्धतीने सुरु आहेत. रुग्णालयात सुरु असलेल्या विभागाची माहिती घेतली. चोवीस तास रुग्णालय सुरु ठेवताना कोणत्या अडी-अडचणी येतात. काही त्रुटी आहेत का, त्यावर कशा मार्ग काढायचा याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच रुग्णांना दर्जेदार, तातडीने वैद्यकीय सुविधा देण्याच्या सूचनाही ढाकणे यांनी दिल्या.

 वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे, थेरगाव रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार, जिजामाता रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सुनीता साळवे, डॉ. नासेर अलवी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, उपस्थित होते.

वायसीएमवरील ताण कमी झाला!
महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर रुग्णसेवेचा सर्वाधिक ताण पडतो. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहर परिसरातील अन्य रुग्णालयांचा विस्तार आणि नवीन रुग्णालयांचे बांधकाम केले. थेरगाव, आकुर्डी, जिजामाता आणि भोसरी येथे रुग्णालय बांधले. या चार  रुग्णालयांत प्रसूती विभाग, अतिदक्षता विभाग, जनरल ओपीडी, बालरोग विभाग, सोनोग्राफी या सुविधा सुरू केल्या आहेत. ही रुग्णालये चोवीस तास सुरु केली आहे. परिसरातील नागरिकांसाठी जवळच्या जवळ सुविधा सुरु झाल्या आहेत. चार रुग्णालये चोवीस तास सुरु झाल्याने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावरील ताण कमी झाला आहे.