महापालिका निवडणूक वेळेत होणार – शनिवारी प्रभाग रचनेचा आराखडा सादरिकरण, २७ जानेवारी पासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

0
1292

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – कोरोनाचा वाढता प्रसार, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यामुळे महापालिका निवडणूक वेळेत होणार की नाही याबाबत बहुसंख्य राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. राज्य निवडणूक आयोगा समोर पिंपरी चिंचवड प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादरिकरण उद्या (१५ जानेवारी) होणार असून त्यानंतर १५ ते २० दिवसांत निवडणूक जाहिर होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला त्याचा पूरता अंदाज आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून शेकडो कोटी रुपयेंच्या विकास कामांच्या निविदा काढण्यात येत आहेत. २०१७ मध्ये प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदारयादी निश्चिती ५ जानेवारी पर्यंत जाहीर होऊन २७ जानेवारी रोजी आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिध्द केली होती. २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होऊन १४ मार्च ला पहिला सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. प्रशासनाची सर्व तयारी होत आल्याने निवडणूक ठरल्या वेळेत होण्यात कोणती अडचण दिसत नाही.

मागच्या निवडणुकित चार सदस्यांचा प्रभाग होता तो यावेळी तीन सदस्यांचा करण्यात आला. रस्ता, नदी, नाला, रेल्वे लाईन अशा नैसर्गीक हद्दींचा विचार करून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने त्यात काही फेरबदल सुचविले होते, त्यानुसार प्रभाग रचना करण्यात आली. गतवेळी एक प्रभाग ४० ते ४५ हजार मतदारसंख्येचा होता आता तो सुमारे ३३ ते ३५ हजार मतदारांचा असू शकतो. गतवेळी १२८ जागा होत्या आताच्या फेरबदलात त्या १३९ झाल्या असून तीन सदस्यांचे ४५ आणि चार सदस्यांचा एक मिळून ४६ प्रभाग असणार आहेत. ७० महिला आणि ६९ पुरुष नगरसेवक असणार असल्याने महिला राज असेल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार हे आता स्पष्ट असून सर्वसाधारण जागा वाढणार आहेत

प्रभाग रचनेसाठी दोन वेळा मुदतवाढ दिल्याने तसेच कोरोनाची तिसरी लाट जोरात असल्याने निवडणुका वेळेत होणार का याबाबत साशंकता होती. राज्यातील महाआघाडी सरकराने ओबीसी आरक्षण लागू केल्याशिवाय निवडणूक नको अशी भूमिका घेतल्याने संभ्रमात आणखी भर पडली. प्रत्यक्षात देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केल्याने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठरल्या वेळेतच होणार याचा साधारण अंदाज आला. आता राजकीय आणि प्रशासकीय सुत्रांकडून त्याला दुजोरा मिळतो आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला याचा सुगावा लागल्याने पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटने आणि नियोजित कामांचे भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. स्थायी समितीच्या मागच्या दोन बैठकांतून एकाच वेळी सुमारे ४२५ कोटींची कामे मंजूर कऱण्यात आली. विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यासाठीच्या वर्तमान पत्रांतील जाहिरातींची संख्या दुपटीने वाढली आहे. राजकीय गोटात भाजपामध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. बूथ पातळी पर्यंतची संपर्क यंत्रणा सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे यावेळी गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीने प्रभाग रचनेपासून तयारी केली असून संभाव्य उमेदवार कोण असावेत यासाठी एका यंत्रणेमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे दोघे शहरात न येता लक्ष ठेवून आहेत.

अडिच लाख मतदार वाढले –
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्यावत कऱण्याचे काम सुरू आहे. तीन विधानसभा मतदारसंघात मिळून शहरात ६७ हजार २७६ मतदार वाढले. २०१७ मध्ये ११ लाख ९२ हजार ५९ मतदार होते आता एकून १४ लाख ३२ हजार ३४० संख्या झाली आहे. गेल्या पाच वर्षांच २ लाख ४० हजार २८१ मतदार वाढले आहेत.