महापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत; आमदार जगतापांचा घणाघाती पलटवार

0
4256

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – मोदी लाटेत खासदारकीची लॉटरी लागलेले मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना या पदाचा उपयोग पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी करता आला नाही. ते किती निष्क्रिय खासदार आहेत, हे महापालिका निवडणुकीत शहरातील जनतेनेच सांगितले आहे. निष्क्रियतेमुळेच खासदार केलेल्या याच जनतेने महापालिका निवडणुकीत बारणे यांच्या कानफटात लगावली हे ते खूप लवकर विसरले आहेत. ते केवळ विकासातच सपशेल अपयशी ठरले नाहीत, तर स्वपक्ष शिवसेनेची पूर्ण वाट लावण्यात सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी घरातली माणसे सोडल्यास एक सुद्धा शिवसैनिक मोठा केला नाही. आता बारणे भाजपमध्ये दुही माजवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. भाजपबद्दल एवढेच प्रेम होते, तर त्यांनी गेल्या साडेचार वर्षांत भाजपच्या एका तरी कार्यकर्त्याला केंद्राच्या समितीवर किंवा इतर ठिकाणी संधी देणे गरजेचे होते. लोकसभेचे रणांगण अगदी जवळच आले आहे. महापालिका निवडणुकीत कानफटात लगावलेली हीच जनता लोकसभा निवडणुकीत बारणे यांना कायमचे घरी बसवतील, असा घणाघाती पलटवार भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी (दि. २१) आकुर्डीत झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अतिक्रमण झाले आहे, अशी टिका केली होती. त्याला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार जगताप म्हणाले, “बारणे यांना मोदी लाटेमुळे खासदारकीची लॉटरी लागली हे त्रिकालाबाधित सत्य आहे. या लॉटरीचा त्यांनी शहराच्या विकासासाठी वापर करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यांच्या खासदारकीच्या पाच वर्षांचा लेखाजोखा पाहिल्यास त्यांचे शहर विकासात योगदान काय आणि किती?, असा प्रश्न शहरातील सामान्यांना पडला आहे. केंद्राशी निगडित असलेले शहरातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. जे काही प्रश्न सुटले त्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत केलेल्या पाठपुराव्याचे फळ आहे. खासदार बारणे यांनी निवेदने देऊन केवळ फोटो काढण्यापलीकडे आणि त्याच्या बातम्या छापून आणून भरपूर प्रसिद्धी मिळवण्यापलीकडे दुसरे कामच केलेले नाही. त्यामुळे नुसते फोटो काढणारा खासदार म्हणून राजकीय वर्तुळात त्यांची प्रचंड ख्याती निर्माण झाली आहे. हीच त्यांच्या खासदारकीची जमेची बाजू राहिली आहे.

आता निवडणूक जवळ आल्यानंतर खासदार बारणे यांना आपण मावळ मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. याच स्वप्नात वावरत ते जनतेची दिशाभूल करू लागले आहेत. मी केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा खासदार होणार, असा विश्वास व्यक्त करून ते जनतेला चक्क फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, याच जनतेने निष्क्रियतेच्या निकषांवर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदानाद्वारे खासदार बारणे यांच्या कानफटात लगावली होती, हे वास्तव ते लवकर विसरले आहेत. महापालिका निवडणुकीत बारणे यांना त्यांची जागा दाखवणारी याच शहरातील मतदारराजा खासदारकीच्या निवडणुकीत सुद्धा पाच वर्षांचा हिशोब चुकता करेल. शहरातील मतदारराजा नेहमी विकासाच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही हा मतदारराजा विकासाचा भुलभुलैय्या दाखवणाऱ्या खासदार बारणे यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देईल.

खासदार बारणे हे केवळ विकासकामांबाबतच निष्क्रिय खासदार ठरले नाहीत, तर शिवसेनेची पूर्णपणे वाट लावणारे खासदार म्हणूनही कुप्रसिद्ध आहेत. बारणे हे खासदार झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच नाही, तर संपूर्ण मावळ मतदारसंघात शिवसेनेची वाताहात झाली आहे. ते खासदार झाले तेव्हा महापालिकेत शिवसेनेचे १४ नगरसेवक होते. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे अवघे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. खासदार बारणे यांनी शहरात विकासकामांचा केवढा मोठा डोंगर उभा केला आणि त्यांची किती लोकप्रियता आहे, हे यावरून स्पष्ट होते. एकेकाळी शहराच्या आणि महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेच्या वाघाचा दरारा होता. आता हा पक्ष रसातळाला गेला आहे. खासदार बारणे यांनी आपल्या घरातील माणसे सोडल्यास एका तरी शिवसैनिकाला मोठे केले आहे का?, हे त्यांनी सांगावे. आपल्या पक्षाची वाट लावून आता ते भाजपमध्ये दुही माजवण्याचा राजकीय डाव खेळत आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगताना खासदार बारणे हे त्या कार्यकर्त्यांसोबत प्रामाणिक राहिले का? हा खरा प्रश्न आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या जिवावर खासदार झाल्यानंतर बारणे यांनी एका तरी कार्यकर्त्याला केंद्राच्या विविध समित्या किंवा इतर ठिकाणी सदस्य करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात बारणे यांनी भाजपच्या एकाही निष्ठावान कार्यकर्त्याला कोठेही संधी दिली नाही. त्यामुळे आपल्याच शिवसैनिकांना देशोधडीला लावणाऱ्या खासदार बारणे यांनी भाजपमध्ये दुही माजवण्याच्या फंदात पडू नये. तसे दिवास्वप्नही त्यांनी पाहू नये. लोकसभेचे रणांगण अगदी जवळच आले आहे. गेली साडेचार वर्षे भाजपला केवळ नावे ठेवण्यातच धन्यता मानणाऱ्या बारणे यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दिसेल, अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला आहे.”