पिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले

0
745

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरूणाला १० लाखाला गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २५ एप्रिल २०१७ ते ९ नोव्हेंबर २०१७ च्या दरम्यान घडला. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल राजेंद्र खापरे (वय ३२, सुकवाणी फॉर्चुन, मोरवाडी, मुळ. सेलू जि. वर्धा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विशाल संजय शिंदे (वय २३, रा. देडगाव, ता. नेवासा, जि. अदमदनगर) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिलने फिर्यादी विशालला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. रेल्वेमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने सुनिलने विशालकडून वेळोवेळी सुमारे १० लाखाची रक्कम घेतली. हा प्रकार एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०१७ च्यादरम्यान घडला. तेव्हापासून आपल्याला नोकरी लागणार, या आशेवर विशाल विसंबून बसला होता. मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची नोकरी लागली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे विशालच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पिंपरी पोलिस ठाण्यात धाव घेवून गुन्हा दाखल केला. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.