महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घोषणांचा पाऊस

0
191

चिंचवड, दि. 9 (पीसीबी) – 2023 – 24 चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणांचा पाऊस असेच प्रथमदर्शनी दिसून येते, अशी टीका स्वराज अभियान – महाराष्ट्रचे अध्.क्ष मानव कांबळे यांनी केली आहे.

प्रसिध्दीपत्रात कांबळे म्हणतात, अनेक नव्या स्मारकांची घोषणा करण्यात आली, परंतु अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारका संदर्भात मात्र कुठलाही उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला नाही. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्याबाबतीत भरीव अंदाजीत तरतूद जाहीर करणे अपेक्षित होते परंतु त्या बाबतीत अर्थमंत्र्यांनी निराशा केली आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने प्रति वर्ष सहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा स्वागतार्ह असली तरी, ती पुरेशी नाही.

त्याऐवजी शेतमालाला हमीभाव व खर्चावर आधारित शेतीतील उत्पादनाला खात्रीशीर दर देण्याची घोषणा करणे आवश्यक होते. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये केलेली वाढ ही चांगली बाब आहे. त्याचबरोबर शिक्षक सेवकांच्या मानधनांमध्ये केलेली वाढ ही भरीव नसली, तरीही दिलासा देणारी आहे. तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी विशेष योजना सादर करणे गरजेचे होते. त्यासाठी तरतूद करणे आवश्यक होते, त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होत असताना त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या योजना सादर करणे आवश्यक होते.

वेगवेगळ्या घोषणांच्याद्वारे समाजातील सर्व घटकांना भावनिक दृष्ट्या खुश करण्याचा प्रयत्न, या अंदाजपत्रकात अर्थमंत्र्यांनी केला असला तरी, त्या घोषणांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, याबद्दल कुठलाही ठोस आर्थिक कार्यक्रम सादर करण्यात अर्थमंत्री अयशस्वी झालेले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवून, नवनव्या घोषणा करून सामान्य लोकांना भुलवणे एवढाच उद्देश या अर्थसंकल्पात दिसून येतो.