महापालिका तिजोरीत मालमत्ताकरातून 420 कोटी

0
257

पिंपरी,दि.8 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 5 लाख 86 हजार 598 निवासी व बिगरनिवासी मालमत्ताधारकांपैकी चालू आर्थिक वर्षातील मागील 7 महिन्यांत 2 लाख 65 हजार मालमत्ताधारकांनी 420 कोटी कराचा भरणा केला.

महापालिकेला मालमत्ता करातून 1 एप्रिल ते 5 ऑक्टोबर 2022   या 7 महिन्यांच्या कालावधीत 420 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यात  1 लाख 73 हजार 300 मालमत्ताधारकांनी ऑलनाइन माध्यमातून सर्वाधिक 230 कोटी 82 लाखांचा भरणा केला आहे. तर, आरटीजीएसने 390 मालमत्ताधारकांनी 32 कोटी 65 लाखांची बिले भरली आहेत. रोखीने 52 हजार 762 नागरिकांनी 45 कोटी 65 लाख आणि धनादेशाद्वारे 13 हजार 562 जणांनी 64 कोटी 29 लाखांची बिले भरली आहेत. तर, डीडीद्वारे 682 जणांनी 24 कोटी 31 लाख रूपये भरले आहेत.

आतापर्यंत 3 लाख 21 हजार 598 मालमत्ताधारकांनी  कर भरलेला नाही. कर संकलन विभागाने सन 2022-23 या आर्थिक वर्षांत 1 हजार  कोटींचे उत्पन्न जमा करण्याचे टॉर्गेट ठेवले आहे. आर्थिक वर्षातील 7 महिन्यांत केवळ 420 कोटी रुपये जमा झाले. 31 मार्च 2023 पर्यंत म्हणजे 5 महिन्यांत तब्बल अर्थसंकल्पात दिलेले 782  कोटींची वसुली करण्याचे आव्हान कर संकलन विभागासमोर आहे. त्यासाठी कर संकलन विभागाने 50 हजारपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या मिळकतींची जप्तीची कारवाई मोहिम तीव्र केली आहे. त्यासाठी पोलिसांसह तृतीयपंथीयांचे सहाय्य घेण्यात येत आहे.

चिखली कार्यालयाकडे सर्वाधिक 102 कोटी 81 लाखांची वसुली बाकी आहे. वाकड कार्यालयाकडून 81 कोटी 5 लाख, थेरगाव कार्यालयाकडून 75 कोटी 46 लाख, चिंचवड कार्यालयाकडून 68 कोटी 3 लाख आणि भोसरी कार्यालयाकडून 52 कोटी 67 लाख मिळकतकर वसुल करणे अद्याप प्रलंबित आहे. पिंपरीगाव कार्यालयाकडे 49 कोटी 39 लाख, निगडी प्राधिकरण कार्यालयाकडे 47 कोटी 31 लाख, सांगवीकडे 44 कोटी 84 लाख, पालिका भवनाकडे 46 कोटी 22 लाख, फुगेवाडी-दापोडीकडे 44 कोटी 36 लाख, मोशीकडे 43 कोटी 23 लाख अशी सर्वाधिक बिलांची वसुली थकीत आहे.