महात्मा फुले यांचे विचार भविष्यात प्रत्यकाच्या जीवनाला दिशा देत राहतील..

0
48
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे प्रतिपादन

पिंपरी, दि. 11 – महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं योगदान अनमोल आहे. महात्मा फुले आणि समता हे शब्द जणू हातात हात घालून येतात. महिलांनाही पुरुषांइतकाच शिक्षणाचा अधिकार आहे असं केवळ ज्योतिराव फुले बोलून थांबले नाहीत. तर, प्रत्यक्षात तसा अधिकार महिलांना मिळावा म्हणून त्यांनी आयुष्य वेचलं. स्वत:च्या पत्नीपासून त्यांनी याची सुरुवात केली व पुढं महिलांसाठी शिक्षणाचा राजमार्ग खुला करून दिला.

महात्मा फुले यांचे सामाजिक विचार अत्यंत प्रखर होते. बालविवाह व विधवांच्या शोषणाविरोधात त्यांनी आवाज उठवला. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी म्हणून ते सतत झटत राहिले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना स्वत:च्या विचारांसाठी तत्कालीन परंपरावाद्यांकडून शेणाचा माराही सहन करावा लागला. मात्र ते बधले नाहीत असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी गुरूवार (दि.११) केले. तसेच आजच्या तरूण पिढीने फुले दाम्पत्यांचा आदर्श ठेवून भविष्याची वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंत्तीनिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील क्रांतिसूर्य फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच खराळवाडी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गव्हाणे बोलत होते. याप्रसंगी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, ॲड.गोरक्ष लोखंडे, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, ज्योती गोफणे, ज्ञानेश्वर कांबळे, कुमार कांबळे, राजू चांदणे,यश बोथ, निखिल घाडगे, मीरा कांबळे, रजनी गोसावी, संजय बनसोडे, धनाजी तांबे, सुन‍िल अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल यांनी केले.