महागाई, बेरोजगारीवरील ‘देखावे’ दाखवा ; संजय राऊतांचा निशाणा  

0
751

मुंबई, दि. १ (पीसीबी) – काँग्रेस राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारी वाढत गेली तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवांत या विषयावरील जनजागृतीचे देखावे बेडरपणे सजवले जात होते.  आज महागाई, बेरोजगारीबाबत जागृती करणारे ‘देखावे’ एखाद्या सार्वजनिक मंडळाने उभे केले असतील तर दाखवा, असे आवाहन करून शिवसेना खासदार  संजय राऊत यांनी भाजप सरकारवर प्रहार केला आहे.

संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक सदरातून देशातील आर्थिक परि स्थिती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून  मोदी-शहा यांच्यावर तोफ डागली आहे.

राऊत म्हणाले, यंदाची गणपतीची स्वारी वाजतगाजत येणार की मंदीच्या रस्त्यावरून धिम्या गतीने येणार यावर चर्चा सुरू आहे. आर्थिक मंदीच्या संकटाने महाराष्ट्रात बेरोजगारीचा पहाड निर्माण झाला आहे. तरीही बेरोजगार हात मोठ्या डौलाने घरात आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करतील. आता गणपतीचा उत्सवही मराठीजन साधेपणाने साजरा करतील. पण त्यानंतर येणारा नवरात्रोत्सव आणि श्रीमंतांचा दांडिया पूरग्रस्तांचे भान ठेवील काय, ही शंकाच आहे. मंदीचा फटका मराठमोळ्या सणांना बसतो तसा ‘रास दांडियां’ना बसणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

टिळकांचा गणेशोत्सव आता राजकीय पुढाऱयांचा उत्सव बनला आहे. ‘गणेशोत्सवावर या वेळी मोदींचा प्रभाव’ अशा बातम्या मी वाचल्या. याचा नेमका अर्थ मला समजला नाही. काँग्रेस राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारी वाढत गेली तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवांत या विषयावरील जनजागृतीचे देखावे बेडरपणे सजवले जात होते. आज महागाई, बेरोजगारीबाबत जागृती करणारे ‘देखावे’ एखाद्या सार्वजनिक मंडळाने उभे केले असतील तर दाखवा. मोदी सरकारने ३७० कलम, ट्रिपल तलाक याबाबतीत उत्तम कामगिरी पार पाडली आहेच. त्यावरही देखावे व्हावेत, पण मोदी व शहा यांना म्हणजेच सरकारला जे लोक विघ्नहर्त्या गणपतीच्या स्वरूपात पाहतात त्यांनी महागाई, बेरोजगारीचे विघ्न कोणी दूर करावे यावरही गणेशोत्सवात जागृती करायला हवी, असे राऊत म्हणाले.