तुम्ही ‘शाह’ असाल पण संविधान बादशाह”आहे

0
574

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘फादर ऑफ नेशन’ उल्लेख करण्यावरुन पुन्हा एकदा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नरेंद्र मोदी राष्ट्रपिता असतील पण माझ्यासाठी महात्मा गांधी हेच राष्ट्रपिता आहेत असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. तसेच तुम्ही ‘शाह’ असाल पण संविधानच बादशाह आहे असाही टोलाही यावेळी त्यांनी लगावला. औरंगाबादमध्ये सभेत ते बोलत होते.

“औरंगाबाद शहर मला प्रचंड प्रिय आहे. इतके की मला कधी मृत्यू झाला तर औरंगाबादच्या जमिनीवर यावा,” असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच इम्तियाज जलील यांचा विजय हा प्रत्येक मतदाराचा आणि भारताच्या संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.

“जगाला धोका देण्यासाठी हे गांधींचं नाव घेतात. गांधीचे नाव घेऊन सत्तेचे दुकान चालवत आहेत,” असा आरोप यावेळी ओवेसी यांनी केला. “महात्मा गांधींबद्दल बोलताना यांच्या ओठांवर गांधींचे नाव असते पण डोक्यात नथुराम गोडसे आहे,” असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे. सत्ताधारी पक्ष गोडसेला आपला आदर्श मानते असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

“गोडसे गांधींच्या भारताला संपवत आहेत. गोडसेने गांधींना तीन गोळ्या मारल्या, पण हे गोडसे रोज अनेक गोळ्या मारत आहेत. भारताला गोडसेच्या विचारांमध्ये बुडवण्यासापून थांबवलं पाहिजे,” असे आवाहन यावेळी ओवेसी यांनी केले.