“मला आज आमदार असण्याची लाज वाटते”

0
417

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोना दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करू लागला आहे. त्यातच दिल्लीच्या अनेक रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा अपुरा साठा असल्याची तक्रार केली जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी देखील सुरू आहे. मात्र, या सगळ्यामध्ये दिल्लीतल्या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडत नसल्याचे आरोप होत आहेत. यासंदर्भात दिल्ली सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना आता दिल्लीत ज्या पक्षाचं सरकार आहे, त्या आम आदमी पार्टी च्याच एका आमदाराने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे. दिल्लीतील माटिया महल विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार शोएब इकबाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. काँग्रेससोबतच भाजपाच्याही अनेक ट्विटर हँडल्सवरून हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शोएब इकबाल यांनी भावनिक होऊन दिल्लीतली परिस्थिती विषद केली आहे.

पैसा आहे, पण ऑक्सिजन मिळत नाहीये!
शोएब इकबाल यांनी व्हिडिओमध्ये दिल्लीमधील कोरोनाच्या परिस्थितीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “आज मला दिल्लीची परिस्थिती पाहून रडू येत आहे. रात्रभर मला झोप येत नाहीये. लोकांना दिल्लीत ऑक्सिजन मिळत नाहीये, औषधं मिळत नाहीयेत. माझा मित्र यावेळी दिल्लीच्या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात तडफडतो आहे. त्याच्याजवळ ना ऑक्सिजन आहे ना व्हेंटिलेटर आहे. रात्रीपासून माझ्याकडे औषधांची चिठ्ठी आहे. मी त्याला कुठून रेमडेसिविर आणून देऊ? देव करो आणि त्याचं काही बरं-वाईट न होवो. मुली रडत आहेत. सगळं आहे, पैसा आहे पण त्याला औषधं मिळत नाहीयेत. ऑक्सिजन मिळत नाहीये”, असं शोएब इकबाल या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. या व्हिडिओमध्ये आमदार शोएब इकबाल यांनी दिल्ली सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मला आज आमदार असण्याची लाज वाटत आहे. आम्ही कुणाच्या मदतीला उपयोगी पडू शकत नाहीयेत. सरकार मदत करू शकत नाहीये. मी ६ टर्म आमदार आहे. दिल्लीतला सगळ्यात ज्येष्ठ एकच आमदार आहे. पण त्यानंतरही कुणी ऐकणारं नाही. कुणाला संपर्क करायचा? कोण नोडल अधिकारी आहे कळत नाहीये. त्यामुळे माझी विनंती आहे की दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी. दिल्लीत फार गंभीर परिस्थिती आहे. असं झालं नाही तर रस्त्यांवर प्रेतं दिसू लागतील”, असं शोएब इकबाल यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, शोएब इकबाल यांच्या या व्हिडिओनंतर भाजपा आणि काँग्रेसकडून दिल्ली सरकारवर टीका केली जाऊ लागली आहे. गोवा काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्वीट करत दिल्ली सरकारवर निशाणा साधला आहे.