“मलाना क्रीम घेऊन कोणी काही बोलत असेल तरीही बापूंचे विचार संपणार नाही”

0
371

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अभिनेत्री कंगना रणावत यांनी काढलेल्या उद्गाराचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून कंगनावर जोरदार टीका केली आहे. मलाना क्रीम घेऊन कोणी काही बोलत असेल तरीही बापूंचे विचार संपणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी कंगनाला लगावला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते. तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत, जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही, असं मलिक म्हणाले. ज्या लोकांनी बापूंची हत्या केली ते पण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे, असंही त्यांनी सांगितलं. नियोजनबद्ध पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे असं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळेच हे लोक अशा पध्दतीने वारंवार असे बोलत असतात, असं त्यांनी सांगितलं.

कंगना रणावत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले केले आहे. अहिंसेचा विचार जगाने स्वीकारला आहे. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवलं तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो. मात्र तिने बापूंचा अपमान का केला आणि तिचा बोलविता धनी कोण आहे हे देशाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनावर टीका केली आहे. . वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोण करतं? एनसीबीने त्याचा तपास करावा ही मागणी आहे, असा टोला राऊत यांनी कंगनाला लगावला. चीनने आपल्या गालावर थप्पड मारली आहे. चीन लडाखमध्ये घुसला आहे. चीन अरुणाचल प्रदेशात घुसला आहे. तरीही आम्ही दुसरा गाल पुढे केला आहे. काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्या होत आहेत. या देशात बरंच काही चाललं आहे. हे त्या मॅडमला माहीत असलं पाहिजे. आज देशाची अवस्था काय आहे हे त्यांना माहीत पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.