मराठा वकिलांची फौज असली पाहिजे – खासदार संभाजी राजे यांचे आवाहन

0
260

कोल्हापूर, दि. ४ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये पुढाकार घ्यावा,असे आवाहन संभाजीराजे कोल्हापूरमध्ये आयोजित न्यायिक परिषदेत बोलताना केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला ईडब्लूएस मधून आरक्षण नको या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ईडब्लूएस आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून वर दबाव टाकलाच पाहिजे. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई देखील महत्वाची आहे. न्यायिक परिषदेची चळवळ संपूर्ण राज्यात जावी, अशी आशा संभाजीराजेंनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी आता आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. मागे काय झालं ते पाहायचं नाही, आता पुढे काय होणार ते पाहिलं पाहिजे. कायदेशीर लढाई लढणाऱ्यांना पाठिंबा कसा देता येईल ते पाहिले पाहिजे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. स्थगितीवर आज काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ईडब्लूएस स्वीकारून मराठा आरक्षणासाठी 42 जणांनी दिलेले बलिदान व्यर्थ घालावायच का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी विचारला. ईडब्लूएस घेतल्यावर धोका होणार नाही, याची जबाबदारी समर्थन करणाऱ्यांनी घ्यावी. ईडब्लूएस मधून आरक्षण घेण्याची भूमिका असणाऱ्यांनी एसईबीसी ला धोका होणार नाही, असे लिहून द्यावे, असे आव्हान संभाजीराजेंनी दिले.

2014 नंतर ईएसबीसी आरक्षण आणि त्यानंतर एसईबीसी आरक्षणांतर्गत अनेकांना नियुक्तीच्या ऑर्डर मिळाल्या मात्र, त्यांना कामावर घेतले जात नाही. राज्य सरकारच्या हातात हा विषय आहे, त्यावर सरकार निर्णय का घेत नाही, असा सवाल संभाजीराजेंनी केला.

सारथी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजर्षी शाहू शिष्यवृत्ती, मराठा समाजासाठी वसतिगृहे याबाबत सरकार काम का करत नाही. वकिलांनी याबाबत सरकारला जाब विचारावा. यासंदर्भात आवाज उठवला पाहिजे. कोल्हापूरकरांनी यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयात याचिका दाखल करावी, असे आवाहन संभाजीराजेंनी केले. बीए केलं, एमबीए केलं वकील झालो असतो तर बर झालं असतं, असेही संभाजीराजे यांनी न्यायिक परिषदेत म्हटले.