मराठा आरक्षण तातडीने द्या; राजू शेट्टींची लोकसभेत मागणी

0
510

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज (बुधवार) लोकसभेत केली.

राजू शेट्टी म्हणाले की, देशात हरियाणा, राजस्थान, पंजाबमध्ये आरक्षणावरून हिंसक आंदोलने होत आहेत. मात्र, सध्या संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरुन रस्त्यावर उतरलेला आहे. लाखोंचे मोर्चे काढले जात असताना सरकारने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे, असा दावा राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

मराठा समाजातील मोठा वर्ग शेतकरी आहे. शेतकरी कर्जबाजारी असून त्याला मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे तोट्यातील शेती, डोक्यावरील वाढते कर्ज, तसेच नोकरीची नसलेली हमी यामुळे मराठा समाजाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.