मराठा आरक्षणासाठी सरकारने अगदी प्रामाणिक प्रयत्न केले; संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया

0
633

सातारा, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली असून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील आणि नोकरीतील मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असून राज्य सरकारला आरक्षण जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. मात्र १६ टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘मुख्यमत्र्यांनी अत्यंत योग्यपणे भूमिका मांडली. मराठा आरक्षण मिळावे यासाठी सरकारने अगदी प्रामाणिक प्रयत्न केले’. यावेळी त्यांनी १६ की १२ टक्के हा मुद्दा नसून आरक्षण टिकले हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मराठा समाजाने आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपुर्वी आरक्षण गेले खड्ड्यात असे ट्विट केले होते. यावर बोलताना ती माझी संतापाची भावना होती असे सांगितले. पण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना शिक्षण मोफत मिळाले पाहिजे अशी शाहू महाराजांची भूमिका होती. बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजाचे घटक आणि नंतर मुख्यमंत्र्यांना फोन करुन आपण अभिनंदन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.