मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त श्री.संतोष खवळे यांना मराठवाडा भूषण युवा गौरव पुरस्कार जाहीर

0
145

 

पिंपरी दि. २० (पीसीबी) – महाराष्ट्रात १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी मराठवाड्यामध्ये जन्म घेऊन कृषी, शैक्षणिक, औद्योगीक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. याच अनुषंगाने धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक श्री. संतोष खवळे यांना पशुपालन व दुग्धव्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मराठवाडा मित्रपरिवार आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाडा भूषण युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आपल्या कामाची पोचपावती तेंव्हाच मिळते जेंव्हा आपण समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवतो. असंच उल्लेखनीय काम करून दाखवलंय उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा (बु) या छोट्याशा गावातील उच्चशिक्षित तरुण श्री. संतोष खवळे यांनी. त्यांचा जन्म ग्रामीणभागात झालेला असल्यामुळे ग्रामीणभागातील जनजीवन हे त्यांना लहानपणापासूनच ज्ञात होते. ग्रामीण भागातील 80 टक्के लोक हे शेतीला जोडधंदा म्हणून पारंपारिक पद्धतीने दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात.
या व्यवसायात पिढ्यानपीडा तांत्रिक व आर्थिक परिस्थितीमध्ये म्हणावा तेवढा बदल होत नव्हता. ही गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, त्यांचे व्यवस्थापन कुठे चुकते, त्यांचा दुग्धव्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे या सर्व गोष्टींची त्यांनी चाचपणी कित्येक पशुपालकांच्या गोठ्यावर जाऊन केली. तेव्हा त्यांना ठळकपणे जाणवले की त्यातून फक्त शेतकऱ्याची तगमग होत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, आपल्या शिक्षणाचा समाजासाठी काहीतरी वापर व्हावा हा विचार मनामध्ये घेऊन २०१९ साली त्यांनी धेनू ॲपच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्या घाट घातला .

श्री. संतोष खवळे हे शेतकऱ्यांना देखील नवीन तंत्रज्ञान वापरून पशुपालन करता यायला हवे यासाठी नेहमी आग्रही असतात. धेनू ॲप पशुपालकांची नेमकी गरज ओळखून ते अपडेट व्हावे, खचले जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करते. यासाठीच ॲपमध्ये सर्व गोष्टी एकाच ठिकाणी करता याव्यात या उद्देशाने शेतकऱ्यांच्या पशुपालना संबंधित प्रत्येक प्रश्नांच्या निरसनासाठी मंच विभाग, जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन पशु बाजाराची सोय, दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञानासाठी पशुज्ञान हा विभाग तसेच जनावरांच्या नोंदीसाठी पशुव्यवस्थापन या विभागाची स्वतंत्र सोय आहे. याशिवाय दररोज पशुधनाच्या काळजीचा मोफत सल्ला, प्रयोगशील पशुपालकांच्या यशोगाथा
तसेच पशुवैद्यकीय तज्ञांचे साप्ताहिक मार्गदर्शन मिळवून दिले जाते. ग्रामीण महिला व शेतकऱ्यांना देखील अतिरिक्त रोजगार प्राप्त व्हावा व त्यातून त्यांच्या कुटुंबाचा वरखर्च भागावा या उद्देशाने टाकावू पदार्थ म्हणून बघितल्या गेलेल्या शेणाला दिव्यामध्ये रूपांतरित करून शेणाचे देखील मूल्यवर्धन करण्यासाठी इकोदीप बनवण्याचे दिपकार हे एक मॉडेल देखील विकसित केले आहे.

विजेशिवाय चालणाऱ्या या मशीनमधून एक महिला दिवसाला पाचशे ते हजार दिवे सहज बनवू शकते. त्यातून त्यांना फावल्यावेळात अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. आज ईकोदीप (पणती) निर्मिती या व्यवसायामध्ये महाराष्ट्रातील कित्येक महिला, शेतकरी, कामगार सहभागी झाले आहेत. त्यांना घरच्याघरी नवीन व्यवसायाची संधी मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सावरत आहे. अशा प्रकारे शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी धेनू कंपनीच्या माध्यमातून श्री संतोष खवळे यांनी सामाजिक बदलचा वसा घेतला आहे