“मनाचा भाव म्हणजे समरसता!” – प्रा. सुधीर गाडे

0
342

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – “मनाचा भाव म्हणजे समरसता होय!” असे प्रतिपादन प्रा. सुधीर गाडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक ०२ मे २०२२ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित पाच दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘आचरू या समरसता!’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्रा. सुधीर गाडे बोलत होते. जनसेवा सहकारी बँकेचे विलास लांडगे, प्रा. दिगंबर ढोकले, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव प्रदीप पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. दिगंबर ढोकले यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतातून, “स्वामी विवेकानंद हे आत्म्याला जागृत करणारे विभूती होते!” असे विचार मांडले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभाग अध्यक्ष शिल्पा बिबीकर यांनी प्रास्ताविकातून १९८४ सालापासून कार्यरत असलेल्या महिला विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उज्ज्वला जाधव आणि वनिता राईलकर यांनी पाहुण्यांचा आणि वक्त्यांचा परिचय करून दिला. महिला विभाग कार्याध्यक्ष प्रा. शैलजा सांगळे यांनी स्वागत केले. प्रा. सुधीर गाडे पुढे म्हणाले की, “हजारो वर्षांची परंपरा असलेले भारतीय तत्त्वज्ञान जगात सर्वात उन्नत मानले गेले आहे; कारण माणूस हा परमेश्वराचा अंश आहे, असे हे तत्त्वज्ञान मानते. असे असूनही जन्माच्या आधारावर भारतात उच्च, नीचता ठरवली जाते. याबाबत शास्त्रापेक्षाही रूढी बलवान ठरल्या आहेत. या विकृतीमुळे “… उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन…” अशी आर्त आळवणी संतांनी केली.

कर्नाटकात कनकदास या हरिभक्ताला मंदिरात प्रवेश नाकारला गेला. या आणि अशा अनेक घटनांमुळे छत्रपती शाहूमहाराज यांनी गंगाराम कांबळे या व्यक्तीला उपाहारगृह काढून दिले; आणि आपल्या दरबारी मानकऱ्यांसोबत तिथे चहा घेतला. अस्पृश्यतेच्या जाचामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा उद्घोष केला. तरीही कायद्याच्या आधारे स्वातंत्र्य अन् समता उपभोगता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. शतकानुशतके ज्या समाजावर अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांनी विद्रोह केला तर संपूर्ण देशाचे अपरिमित नुकसान होईल. या पार्श्वभूमीवर सामाजिक समरसतेचे महत्त्व अधोरेखित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी अस्पृश्यता म्हणजे मनाला जडलेला रोग आहे, असे म्हटले होते; कारण उच्च, नीचता हा प्रश्न मनांत निर्माण होतो. त्याचे निराकरण करण्यासाठी मनावरच उपचार केले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्व समान आहोत, हे बुद्धीच्या पातळीवर मान्य केले पाहिजे. अर्थातच त्यासाठी स्वतःच्या मनाशी मानसिक संघर्ष करावा लागेल. आपल्या वर्तनात जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. सर्व समाज एक आहे या विचारातून बंधुभाव निर्माण होईल. त्याचप्रमाणे आर्थिक स्वावलंबनातून हा प्रश्न अधिक सुकर होईल. सामाजिक उद्रेक वाढावा यासाठी काही खलप्रवृत्ती कार्यरत आहेत, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. सामूहिक प्रयत्नांमधून सामाजिक अंधकार दूर होईल!” विविध संदर्भ उद्धृत करीत प्रा. सुधीर गाडे यांनी आपल्या विषयाची मांडणी केली. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली. मैत्रेयी पेठे यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा कदम यांनी आभार मानले.