मनसेवर मुस्लिम कार्यकर्ते नाराज

0
489

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत देखील मशिदीवरील भोंग्यासाठी अल्टीमेटम दिला. त्यामुळे मनसेचे मुस्लीम कार्यकर्ते राज ठाकरेंवर नाराज आहेत. मुंबईसह मराठवाड्यातील ३५ मनसैनिकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

मुंबईमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सभा झाली होती. यावेळी राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगितले होते. तुम्ही भोंगे काढले नाहीतर आम्ही भोंग्यावरून हनुमान चालिसा वाजवू असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी भोंग्यावर हनुमान चालिसा लावली. तेव्हापासूनच मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू होतं. राज ठाकरेंच्या या भूमिकेला काही मनसैनिकांनी विरोध दर्शवला होता. पुण्यातील वसंत मोरे यांनी देखील विरोध दर्शवला. त्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत राज ठाकरेंनी पुन्हा भोंगे उतरविण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे आता मनसैनिक नाराज झालेले पाहायला मिळत आहे.

मनविसेच्या सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज खान यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंनी अचानक घेतलेल्या भूमिकांमुळे काम करणे कठीण झाले आहे. आतापर्यंत अनेक आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, आता बदललेल्या भूमिकेमुळे राजीनामा द्यावा लागतोय, असे फिरोज खान म्हणाले.