सावधान …अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता बळावली

0
597

मॉस्को , दि. १५ (पीसीबी) – रशियाने युक्रेनवर गेल्या दीड महिन्यांपूर्वी आक्रमण केलं. पण, याठिकाणी युक्रेनियन सैनिकांनी देखील रशियाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर दिलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची युक्रेन युद्धात निराशा झाली आहे. त्यामुळे रशिया अण्वस्त्राचा वापर करेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही संभाव्य अणुहल्ल्याला हलक्यात घेऊ नये, असं सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स म्हणाले. अटलांटा येथे झालेल्या एका भाषणात ते बोलत होते.

जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना, बर्न्स म्हणाले की क्रेमलिनने 24 फेब्रुवारी रोजी हल्ला सुरू झाल्यानंतर लगेचच रशियाच्या आण्विक सैन्याला हाय अलर्टवर ठेवल्याचे सांगितले होते. पण, रशियाने खरंच आपलं अण्वस्त्र तैनात केलंय का? याची माहिती अमेरिकेने घेतली नाही हे अधिक चिंताजनक आहे. सध्या आम्ही खूप चिंताग्रस्त आहोत. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, युद्ध एका मर्यादेनंतर सुरूच असेल तर आण्विक संघर्ष शक्य आहे. रशियाकडे अनेक अण्वस्त्र आहेत. पण, ते हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा कमी शक्तीशाली आहेत, असंही बर्न्स म्हणाले.

रशियन लष्करी सिद्धांतामध्ये एस्केलेट टू डी-एस्केलेट नावाचा एक सिद्धांत आहे. त्यामध्ये पश्चिमेसोबतच्या पारंपारिक संघर्षात जेव्हा गोष्टी वाईट होतात तेव्हा पहिल्यांदा कमी शक्तीशाली अण्वस्त्राचा वापर करावा असं लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर नाटोचे सैन्य युक्रेनच्या मदतीला येतील का? असंही बर्न्स म्हणाले.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर येथील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकांनी युक्रेन सोडून पाश्चिमात्य देशांकडे धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या बुचा शहरात सामूहिकरित्या दफन केलेले मृतदेह आढळले होते. त्यानंतर रशियाच्या सैनिकांनी हे कृत्य केल्याचा आरोप युक्रेनने केला होता. भारतानं देखील या कृत्याचा तिव्र निषेध नोंदवून स्वतंत्र्य चौकशीची मागणी केली होती.