मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ?

850

भोपाळ,  दि. १६ (पीसीबी) – मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.  गेली १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला खाली खेचण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. दरम्यान,  काही सर्वेक्षणांतून मध्य प्रदेशमध्ये सत्तांतराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

भोपाळमध्ये काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ज्योतिरादित्य शिंदे  यांना याबाबत छेडले असता विधानसभा निवडणूक लढण्याचे त्यांनी संकेत दिले.  ते म्हणाले की,  पक्ष कोणता निर्णय  घेईल, ते मला मान्य असेल. पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यास निवडणूक लढवेन.  त्यामुळे मध्य प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.  दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच उज्जैनमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवलीच, तर तेच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव शिंदे काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते होते. तसेच  राजघराण्याचा वारसा असल्याने  ज्योतिरादित्य  यांची जनमानसात चांगली लोकप्रियता आहे.