मंत्री पियुश गोयल सुध्दा म्हणतात… बिल्डर हो, घरे विकून पैसे मोकळे करा, मार्केट सुधारण्याची वाट पाहू नका…

0
362

– रिअल इस्टेटची खरे नाही, आता केंद्र शासनानेही हात झटकले

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – आधीच मंदी त्यात कोरोनाचे संकट, अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राचे आता काही खरे दिसत नाही. महिन्यापुर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी अगदी मोकळेपणाने एक सल्ला या क्षेत्रातील मंडळींना दिला होता, की जे पैसे गुंतवले आहेत ते दर कमी जास्त करून तत्काळ मोकळे करून घ्या. आज पियुष गोयल यांच्यासारख्या बड्या मंत्र्यांनेसुध्दा बिल्डर्स संघटनेच्या वेबिनारमध्ये तोच सल्ला दिला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. सरकार काही मदत करेल आणि मार्केट सुधारले की मग विकू अशा भ्रमात कोणीही राहु नका, असे अगदी स्पष्ट शब्दांत गोयल यांनी सांगितले. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राबाबत सरकारने सरळ हात वर केल्याचे दिसते.
देशातील नामांकीत बिल्डर्स बरोबर आयोजित वेबिनारमध्ये गोयल यांनी बाजारपेठेतील एकूण परिस्थिती आणि केंद्र शासनाची भूमिका याबद्दल वास्तव काय आहे ते दाखवून दिल्याने तमाम बिल्डर्स मंडळींचे डोळे खाडकन उघडले. गोयल म्हणाले, एकतर तुम्ही घरांचे दर कमी करा अन्यथा आहे त्या किंमतीत विकून मोकळे व्हा, असा माझा सरळ सल्ला आहे. मी फार पुढचे पाहतो. तुम्ही जर का सरकार काही मदत करेल, त्यावर आम्ही तरून जाऊ आणि मग बाजारपेठ सुधारेल असे समजत असाल तर ते पहिल्यांदा मनतून काढून टाका. बाजारपेठ इतक्यात सुधारण्याची शक्यता दिसत नाही. परिस्थिती गंभीर आहे. दर वाढण्याची वाट पाहू नका. तुम्ही घरांचे दर कमी करा आणि किमान गुंतविलेले पैसे मोकळे करून घ्या. जे या मार्गाने जातील ते किमान या परिस्थितीत वाचतील. ज्यांचे मोठे कर्ज आहे त्यांनी विचार करावा अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोयल यांनी दिलेल्या सल्ल्याने प्रथितयश बिल्डर्स मंडळी चांगलीच हादरली आहेत. पुणे, मुंबई सारख्या शहरात सुमारे दीड लाख विक्री अभावी पडून आहेत. कोरोनाच्या संकटामुळे एकूण मार्केटमध्येच घसरगुंडी सुरू आहे. ग्राहकांनाही या परिस्थितीत दर आणखी कमी होतील याची प्रतिक्षा आहे. त्यामुळे घरे विकली जात नाहीत. दुसरीकडे बँकांचे व्याज सुरूच आहे. अशात सरकार काहीतरी मदत करेल, अशी मोठी अपेक्षा ठेवून बिल्डर्स होते. प्रत्यक्षात नितीन गडकरी यांच्या पाठोपाठ आता गोयल यांनीही घरांचे दर कमीजास्त करून पैसे खुले कऱण्याचा सल्ला दिल्याने बिल्डर्समध्ये घबराट आहे.