भोसरी मतदारसंघात शिवसेनेसाठी नवा उमेदवार शोधा; उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भोसरीतील राजकीय चित्र बदलणार

0
1178

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात नव्या उमेदवाराचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शनिवारी (दि. १४) पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत ठाकरे यांनी हा आदेश दिला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील कोणत्या दिग्गज नेत्याला शिवसेना गळाला लावणार यावरच या मतदारसंघातील विजयाचे गणित ठरणार आहे. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात काय राजकीय स्थिती निर्माण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीची सध्याची राजकीय अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतीलच एखादा दिग्गज नेता शिवसेनेचे धनुष्य उचलेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. १६) पुणे जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतली. प्रत्येक मतदारसंघनिहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी आगामी निवडणुकांच्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच काही महत्त्वाचे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेकडून लढण्यासाठी नव्या उमेदवाराचा शोध घ्या, असे स्पष्ट आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात आगामी काळात निर्माण होणाऱ्या राजकीय स्थितीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या महिला आघाडी शहरप्रमुख सुलभा उबाळे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा विधानसभा निवडणूक लढविली. दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतही उबाळे यांचा पराभव झाला. त्यामुळे उबाळे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोसरी मतदारसंघात नव्या उमेदवाराचा शोध घेण्याचे आदेश दिल्याचे मानले जात आहे. सध्या शिवसेनेकडे या मतदारसंघात दुसरा तगडा उमेदवार नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेला उमेदवार आयात करावा लागणार हे निश्चित आहे.

उमेदवार आयात करण्यासाठी शिवसेना अन्य राजकीय पक्षातील दिग्गजांना गळ घालणार हेही निश्चित आहे. या मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विद्यमान आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने हे तिघेच तगडे उमेदवार म्हणून समोर येतात. त्यामुळे शिवसेनेची या तीनही दिग्गज नेत्यांवर बारीक नजर असणार आहे. या तिघांपैकी एकजण शिवसेनेत यावा, यासाठी प्रयत्न होतील. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या तिघांपैकी एक दिग्गज नेता शिवसेनेकडून इच्छुक होता. हा नेता सलग तीन दिवस मुंबईत मातोश्रीवर तळ ठोकून बसला होता. परंतु, या नेत्याला शेवटपर्यंत शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही. हा नेता शिवसेनेत गेला असता तर आज महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेला समान वाटा मिळाला असता, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीची गलितगात्र अवस्था आहे. त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुक आधी भाजप किंवा शिवसेनेची उमेदवारी मिळते का?, याची चाचपणी करतील. त्यानंतरच इच्छुक दिग्गज उमेदवार शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीला पसंती देतील, असे सध्याचे चित्र आहे. तसे झाल्यास शिवसेनेला एक तरी दिग्गज नेता उमेदवार म्हणून मिळणे अवघड नसेल. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण असणार यावरच मतदारसंघातील निवडणुकीत काट्याची टक्कर होणार की विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा विजय सोपा असणार हे अवलंबून असेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित न झाल्यास आधी लोकसभेची निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघाच्या राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून जाईल. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात काय राजकीय स्थिती निर्माण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.