भोसरीतील भगतवस्ती, धावडेवस्तीतील अनधिकृत बांधकामे नियमित करा; रवि लांडगेंचे प्राधिकरणाला साकडे

0
706

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – भोसरी परिसरातील भगतवस्ती, धावडेवस्ती आणि गुळवेवस्तीचा बराचसा भाग पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येतो. या भागातील अनधिकृत बांधकामे नाममात्र दंड आकारून अधिकृत करावीत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक व युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवि लांडगे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक रवि लांडगे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “प्राधिकरण हद्दीतील मिळकती पूर्ण मोबदला देवून खरेदी केल्या आहेत. त्याबाबतचे दस्त देखील आहेत. मात्र, तांत्रिक बाबींमुळे या मिळकतींवर बांधकामास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे स्वःमालकीच्या मिळकती असूनही त्यावर स्वखर्चाने उभारलेली बांधकामे अनधिकृत ठरत आहेत. काही जणांनी कर्ज काढून मिळकती घेतल्या व त्यावर बांधकाम केले आहेत. काहींनी दागिने मोडले. तर काहींनी गावाकडील मिळकती विकून याठिकाणी मिळकत खरेदी केल्या आहेत. गरीब कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरीक व मजुरी करुन उपजिविका करणाऱ्या कामगारांनी याठिकाणी घरे बांधली आहेत. या बांधकामांना महापालिकेने नागरी सुविधा पुरविल्या आहेत. त्यांच्याकडून मिळकत कर, पाणीपट्टी व इतर प्रकारचे सर्व कर वसूल केले जातात. प्राधिकरणाकडून ही बांधकामे नियमित केली जात आहेत. मात्र, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क अवाजवी व अन्यायकारक आहे. पीएमआरडीएने अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी पाच टक्के इतका दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर प्राधिकरणाने पाच टक्के दंड आकारुन ही घरे अधिकृत करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

यावेळी रावसाहेब लांडगे, सोमनाथ लांडगे, रोहिदास वाबळे, हनुमंत तावरे, दत्तात्रय लांडगे, श्रीकृष्ण तावरे, अर्जुन केसरी, अशोक वाघमारे, राजकुमार गोंड, दशरथ पवळे, कांतीलाल रणपिसे, तानाजी भोंडवे, सुनील भोपळे, अजित जाधव आदी उपस्थित होते.