भेटीचा वापरही क्षुल्लक राजकारणासाठी करता; मनोहर पर्रिकरांचा पत्रातून राहुल गांधींवर निशाणा 

0
972

पणजी, दि. ३० (पीसीबी) –  राफेल कराराबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला दावा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी फेटाळून लावला आहे. आपण फक्त ५ मिनिटे भेटलो, त्या भेटीचा वापरही तुम्ही क्षुल्लक राजकारणासाठी करत आहात, या पाच मिनिटांच्या भेटीत एकदाही राफेल करारावर चर्चा झाली नाही, असा खुलासा पर्रिकर यांनी करून राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला.   

मंगळवारी  राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकर यांची विधिमंडळाच्या संकुलात भेट घेतली होती. या भेटीनंतर राफेल करार करण्यामध्ये ममोहर पर्रिकरांचा काहीही संबंध नव्हता. त्यांना या कराराची माहितीदेखील नव्हती, असा दावा राहुल गांधींनी केला होता. पर्रिकर यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून हा दावा खोडून काढला आहे.

या पत्रात पर्रिकर यांनी  म्हटले आहे की, तुम्ही मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता माझी भेट घेण्यासाठी आलात. माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. तुमच्या या कृतीचे मी स्वागत करतो. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये आलेली तुमची वक्तव्ये बघून मला धक्काच बसला.  तुम्ही माझा दाखला देत काही विधाने केली. मला राफेल कराराविषयी माहिती नव्हती, असे पर्रिकरांनी सांगितल्याचे तुम्ही म्हणालात. पण आपली भेट फक्त पाच मिनिटे झाली, या भेटीत आपल्यात राफेल करारावर चर्चा देखील झाली नाही, असे पर्रिकरांनी सांगितले.