भिशीचे पैसे भरण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने चोरला ट्रक; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

0
238

चिखली, दि. १६ (पीसीबी) – करणाऱ्या एकाने भिशीचे पैसे भरण्यासाठी चक्क लोखंडी स्टीलने भरलेला ट्रक चोरला. चोरी झालेल्या ट्रक चालकाने यासाठी त्याला साथ दिली. हा प्रकार चिखली परिसरात घडला असून गुन्हे शाखा युनिट एकने मूळ ट्रक चालक आणि त्याचा साथीदार बस चालक या दोघांना अटक केली आहे.

शशीकांत आजिनाथ माने (वय 35, रा. मोरेवस्ती, चिखली), विकास राजुरकर (वय 42) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांकडून ट्रक आणि लोखंडी स्टील असा एकूण 11 लाख 66 हजार 777 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान नवनाथ खरात (वय 30, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, खरात यांचा ट्रक ड्रायव्हर विकास राजूरकर जालना येथून 23 टन लोखंडी स्टील घेऊन 12 ऑक्टोबर रोजी चिखलीत आला. त्याने पहाटे 5 वाजता त्याच्या हरगुडे वस्ती येथील घरासमोर ट्रक लावला आणि घरी गेला. त्यानंतर त्यांचा ट्रक अज्ञात व्यक्तीने चोरून नेला.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि आठ कर्मचाऱ्यांच्या एका पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. घटनास्थळापासून ते देहु आळंदी रोड, मरकळ, पेरणेफाटा, शिक्रापुर फाटा परिसरातील 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे या पथकाने तपासले. तसेच रोडवरील पेट्रोल पंप, ट्राफीक पोलीस, भंगाराची दुकाने, रांजणगाव एमआयडीसी परीसर अशा विविध ठिकाणी शोध घेतला.

कारेगाव केडगाव दौंड रोडवर लोखंडाने भरलेला ट्रक एका हॉटेलचे समोर लावला असल्याची माहिती पोलीस शिपाई विजय मोरे यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी भेट दिली असता मयूर हॉटेल समोर एक ट्रक मिळून आला. हा ट्रक वरील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत आजुबाजुच्या लोकांकडे विचारपूस केली.

ट्रकच्या केबीनमध्ये बसलेल्या आरोपी शशिकांत माने याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात त्याने हा ट्रक मूळ चालक विकास राजूरकर याच्या सांगण्यावरून चोरून आणल्याचे सांगितले.

पोलिसांनी माने आणि राजूरकर या दोघांना अटक करून 11 लाख 66 हजार 777 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना 18 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

12 ऑक्टोबर रोजी विकास स्टील भरण्यासाठी जालना येथे गेला होता. जालना येथून येत असताना दोन्ही आरोपींचा ट्रक चोरण्याचा प्लॅन झाला. माने याला भिशीचे 15 हजार रुपये भरायचे होते. दोघांनी जालना जवळ ट्रकमधील काही स्टील विकले आणि त्या पैशांची दारू प्यायली. आरोपी विकास स्टील भरून चिखली येथे आला. ठरल्याप्रमाणे विकास ट्रक लावून घरी गेला आणि शशिकांत ट्रक चोरून घेऊन गेला.

शशिकांत हा मूळचा जामखेडचा आहे. तो मागील 5 वर्षांपाऊन राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे आगारात बस चालक म्हणून नोकरी करत आहे. लॉकडाऊन पासून तो कामावर जात नव्हता. भिशीचे पैसे भरण्यासाठी तसेच घरखर्चासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने विकास सोबत मिळून ट्रक चोरण्याचा प्लॅन बनवला.

ट्रक चोरल्यानंतर माने याच्याकडे ट्रकमध्ये डिझेल भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो एका हॉटेल समोर ट्रक लावून थांबला होता. मागून विकास पैसे घेऊन येणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी दोघांना पकडले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक फौजदार रविंद्र गावंडे, सुभाष सावंत, पोलीस कर्मचारी मारूती जायभाये, अजंनराव सोडगिर, विजय मोरे, सचिन मोरे, प्रमोद गर्जे यांच्या पथकाने केली आहे.