भारत-भूतानसारखे शेजारी देश जगात कुठेच नाहीत –नरेंद्र मोदी

0
716

थिम्पू, दि. १८ (पीसीबी) – भूतान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी रॉयल युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना संबोधित केले. एकमेकांमध्ये उत्तम ताळमेळ असलेले भारत-भूतानसारखे शेजारी देश जगात कुठेच नाहीत, असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. सध्याच्या घडीला भारतीय विद्यापीठांमध्ये भूतानचे चार हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा आकडा वाढला पाहिजे, असेही ते म्हणाले.

जगातील सर्वात आनंदी देश अशी भूतानची ओळख आहे. भूतानने सामंजस्य, करुणा आणि एकतेची भावना जपली आहे. भूतानमधील विकास आणि पर्यावरण यांचा एकमेकांना अजिबात अडथळा नाही, असेही मोदी म्हणाले. यावेळी भूतानच्या विद्यार्थ्यांचे मोदींनी कौतुक केले. तुमच्या येथे येऊन खूपच चांगले वाटले. आज रविवार आहे आणि एका लेक्चरसाठी यावे लागले असे तुम्हाला वाटले असेल, पण येथील निसर्गसौंदर्य आणि लोकांचा साधेपणा प्रत्येकालाच मोहून टाकतो, असे मोदी म्हणाले.

भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर इतिहास, सांस्कृतिक परंपरा आदींमध्ये भारत-भूतानमधील संबंध घनिष्ठ आहेत. या ठिकाणी गौतम बुद्ध आले. येथूनच बौद्ध धर्माचा प्रकाश जगभरात पोहोचवला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. ‘सध्याच्या घडीला भारत अनेक क्षेत्रांत पुढे आहे. पायाभूत सोईसुविधांची कामे ५ वर्षांत दुप्पट वेगाने वाढली आहेत. जगातील सर्वात मोठा आरोग्य उपक्रम आयुष्मान भारत देशात राबवत आहोत. भारताकडे स्वस्त डेटा कनेक्टिव्हिटी आहे. जगातील सर्वात मोठे स्टार्ट अप भारतात आहेत. त्यामुळे तरुणांचे स्वप्न पूर्ण होताहेत,’ असे मोदींनी सांगितले.