भारतीय हॉकीचे पुनरागमन लांबणीवर

0
189

नवी दिल्ली, दि.५ (पीसीबी) : कोविडच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय हॉकी संघाचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे. नव्या वर्षाच्या सुरवातीलाच त्यांचा होणारा दक्षिण आफ्रिकेचा दौरा पुन्हा एकदा करोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा १० ते २७ जानेवारी दरम्यान केप टाऊन येथे होणार होती. बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स हे अन्य तीन संघ या स्पर्धेत सहभागी होणार होते. मात्र, केप टाऊनच्या पश्चिम भागात करोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे पूर्ण विचार करून आम्ही ही स्पर्धाच रद्द करत आहोत, असे दक्षिण आफ्रिका हॉकी संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मारिसा लॅनगेनी यांनी सांगितले.

भारतीय पुरुष हॉकी संघ गेल्यावर्षी मायदेशातच झालेल्या एफआयएच प्रो लीगमध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर भारतीय खेळाडू मैदानावरच उतरलेले नाहीत. खेळाडूंच्या आरोग्याच्या दृष्टिने हा निर्णय योग्य असल्याचे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.

गेल्यावर्षी डिसेंबरपासूनच दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती खराब होऊ लागली होती. तेथे दर दिवसाला १० हजार रुग्ण सापडत होते. आता ही परिस्थिती आणखीनच खराब झाली आहे. त्यामुळेच आम्ही ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे ही मारिसा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारतीय महिला संघ रविवारी अर्जेंटिनाला रवाना होईल. महिनाभराच्या दौऱ्यात भारतीय महिला तेथे आठ सामने खेळणार आहेत. त्याचवेळी भारतीय पुरुष संघ पु्न्हा एकदा बंगळूर येथे राष्ट्रीय शिबिरासाठी एकत्र येईल. मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. भारतीय पुरुष संघ आता थेट मार्च महिन्यात आशियाई चॅंपियन्स करंडक स्पर्धेत उतरेल. त्यापूर्वी प्रो लीगच्या अवे टप्प्यात भारतीय संघ एप्रिलमध्ये अर्जेंटिनात खेळेल.