राज्यातील खेळाडूंना दुसरीकडून खेळण्याची सवलत मिळावी

0
188

पुणे, दि.५ (पीसीबी) : राज्यातील कबड्डी गुणवत्तेला सीमा नाही, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गेलो तरी कबड्डी खेळणारे खेळाडू आपल्याला सापडतील. राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून प्रत्येकालाच आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल असे नाही. अशा वेळी संधी हुकलेल्या खेळाडूंना दुसरीकडून खेळण्याची सवलत मिळावी असे सडेतोड मत महाराष्ट्राची अर्जुन पुरस्कार विजेती कबड्डी खेळाडू अभिलाषा म्हात्रे हिने व्यक्त केले.

कबड्डीच्या कुरुक्षेत्रातील महाराष्ट्राचे योद्धे या कबड्डी युनिव्हर्सच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात अभिलाषाने आपल्या आक्रमक खेळाप्रमाणे आपली मतेही आक्रमकपणे मांडली. अभिलाषा म्हणाली,’पुरुष विभागाच्या राष्ट्रीय संघाची रचना बघितली, तर एक गोष्ट दिसून येते की बहुतेक खेळाडू हे हरियानाचे आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपल्या संघाकडून संधी मिळाली नाही, म्हणून हे खेळाडू दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधीत्व करतात. कामगिरी दाखवतात आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवितात. हरियानात जर हे चालते, तर महाराष्ट्राने आपल्या खेळाडूंना अशी सवलत का देऊ नये.’ कार्यक्रमात अभिलाषाला बोलते करणाऱ्या राजू भावसार आणि शांताराम जाधव या बुजुर्ग खेळाडूंनी आपल्याकडे हे शक्य नाही. राज्य संघटनेचे काही आणि त्याचबरोबर राष्ट्रीय संघटनेचे काही नियम आहेत. त्यात हे बसत नाही हे निदर्शनास आणले. मात्र, यावरही अभिलाषाने पर्याय सुचविला. ती म्हणाली,’नियम कडक असावेत यात शंकाच नाही. खेळाडूंमध्ये शिस्त यावी हा नियमांचा हेतू असते. पण, हे नियम जर जाचक असतील, तर यात बदल करण्यात काय हरकत आहे. नियम खेळ आणि खेळाडूंसाठी असावेत. त्यानुसार त्यात बदल करून पाहण्यात काय हरकत आहे.’

महाराष्ट्राकडे सध्या साताऱ्याची सोनाली हेळवी ही एक गुणी खेळाडू आहे. तिच्याकडे अपरिमित गुणवत्ता आहे. तिच्याकडे या वयात कमालीची प्रगल्भता आहे. ती जपायला हवी. आपले खेळाडू आपल्याकडे रहायला हवेत. पण, गुणवत्ता असूनही आपल्याला संधी मिळत नसेल, तर खेळाडूंनी दुसरीकडून खेळायचा विचार केल्यास त्यात गैर काहीच नाही.
-अभिलाषा म्हात्रे

राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राच्या अपयशा विषयी बोलताना अभिलाषाने सराव शिबिराच्या नेहमीच्या मुद्याला हात घातला. ती म्हणाली,’महाराष्ट्र संघाची कामगिरी खालावलेली नाही. त्यांच्यात कमतरता आहे ती मानसिकतेची आणि सरावाची. आपण सुरवातीला रेल्वे आणि आता हिमाचल प्रदेश, हरियाना विरुद्ध हरतो. हिमाचल आणि हरियानाच्या खेळाडू या ताकदीत भारी पडतात, तर रेल्वेच्या खेळाडू या एकत महाराष्ट्राच्याच असतात. खेळाडूंची एक प्रकारे मानसिक कोंडी होते. आधी त्यातून बाहेर पडायला पाहिजे. दुसरे म्हणजे या संघासाठी सरावाची मोठ्या कालावधीची शिबिरे होतात. आपल्याकडे राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी आठ दिवसाचे शिबिर लागते. हा कालावधी निश्चितच अपुरा आहे. दरवर्षी खेळाडू आणि प्रशिक्षक वेगळे त्यामुळे सरावातील बराचसा वेळ हा समन्वय साधण्यातच जातो.’

राजू भावसार यांनी प्रशिक्षक नव्हे, तर येथे फुटबॉल प्रमाणे मॅन मॅनेजमेंट करणारा व्यवस्थापक असायला हवा हा मुद्दा अभिलाषाने उचलून धरला. ती म्हणायली, ‘अशा बदलामुळे एक प्रकारचा व्यावहारिक दृष्टिकोन मिळेल. पण, हा बदल लगेच होणार नाही. त्यापेक्षा प्रशिक्षकाचा कालावधी प्रदिर्घ ठेवला, तर त्याला खेळाडूंची ओळख व्हायला फायदा होईल. खेळाडूला देखिल किमान कालावधीसाठी एकच विचार मिळेल. हा बदल केल्यास महाराष्ट्र संघात नक्कीच फरक जाणविल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाची नियुक्ती करताना तो खेळाडूंशी जेवढ्यापुरता संबंध ठेवणारा नसावा, तर तो खेळाडूंना प्रेरित करणारा असावा.’