विल्यम्सनचे द्विशतक, न्यूझीलंडची मोठी आघाडी

0
322

ख्राईस्टचर्च , दि.५ (पीसीबी) : आयसीसी मानांकनातील आपले अग्रस्थान अधोरेखित करताना न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सन याने आज पाकिस्तानविरुद्ध दुहेरी शतक झळकावले. सलग तीन सामन्यातील हे त्याचे दुसरे द्विशतक ठरले पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात पार पडलेल्या तिसऱ्या दिवसाच्या खेळावर केन विल्यम्सन आणि हेन्री निकोल्स यांच्या फलंदाजीची छाप होती. सदाबहार विल्यम्सनने ९ तास ३३ मिनिटे फलंदाजी करताना २३८ धावांची खेळी केली. हेन्री निकोल्सनेबी दीडशतकी खेळी करताना १५७ धावा केल्या. न्यूझीलंडने दिवस अखेरीस ६ बाद ६५९ धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. न्यूझीलंडकडे आता ३६२ धावांची आघाडी आहे. ही आघाडी विल्यम्सन आणि निकोल्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी झालेल्या भागीदारीपेक्षा फक्त सातने कमी आहे. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ३६९ धावा जोडल्या.

न्यूझीलंडचा धावांचा डोंगर, मोठी आघाडी इथपर्यंतच पाकिस्तानच्या अडचणी मर्यादित राहिल्या नाहीत, तर दिवस अखेरपर्यंत त्यांनी एक गडी देखीर गमावला. खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात १ बाद ८ धावा झाल्या होत्या. पहिल्या डावात पाच गडी बाद करणाऱ्या काईल जेमिसन यानेच पहिले यश मिळविताना शान मसूदला बाद केले.

न्यूझीलंडने ही कसोटी जिंकली, तर त्यांचे आयसीसी क्रमवारीतील पहिले स्थान निश्चि होईल. ते प्रथमच अव्वल स्थान भूषवतील. विल्यम्सन यापूर्वीच अव्वल स्थानावर आला आहे. त्याचवेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याच्या त्यांचा आशांना बळकटी मिळेल.

विल्यम्सनने आपल्या आकर्षक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने चौथे द्विशतक साजरे केले. अशी कामगिरी करणारा विल्यम्सन हा ब्रेंडन मॅकलमनंतरचा दुसराच न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ठरला. पाकिस्तानचे गचाळ क्षेत्ररक्षण आजही कायम राहिले. दिवसातील पहिल्या पावसाच्या व्यत्ययानंतरच्या पहिल्याच चेंडूवर अझर अलीने विल्यम्सनचा झेल सोडला. त्यापूर्वी सकाळी शतकाच्या वाटेवर असणाऱ्या निकोल्सलाही अझरने जीवदान दिले होते.

निकोल्सने १५७ धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या ३ बाद ७१ अशा अडचणीच्या वेळी एकत्र आलेल्या या जोडीने ३६९ धावांची भागीदारी केली. निकोल्स आज थकल्यासारखा वाटत होता. पण, त्याने आक्रमकता सोडली नाही. त्याने आज फटकावलेल्या ६८ धावांपैकी ४८ धावा या केवळ चौकाराने फटकावल्या. विल्यम्सन आणि निकोल्स यांची शतके कमी पडली म्हणून की काय डॅरिल मिशेल यानेही पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत ११२ चेंडूंत १०२ धावांची खेळी केली. मिशेलच्या कारकिर्दीमधीर पहिल्या शतकानंतर विल्यम्सनने न्यूझीलंडचा पहिला डाव घोषित केला.