भारताबरोबर अपघाताने युद्ध होऊ शकते- शाह महमूद कुरेशी

0
428

इस्लामाबाद, दि. १३ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जी परिस्थिती आहे. त्यामुळे भारताबरोबर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. युद्धाचे काय परिणाम आहेत याची भारत आणि पाकिस्तान दोघांना कल्पना आहे. पण सध्याची परिस्थिती कायम राहिली तर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. काहीही घडू शकते असे कुरेशी बुधवारी जीनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्काचे उच्चायुक्त मिशेल बॅचलेट हे प्रदेशाला भेट देण्याचा विचार करत आहेत असे कुरेशी म्हणाले. जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारे कुरेशी यांनी भारत आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागाला भेट देण्याचे निमंत्रण बॅचलेट यांना दिले आहे. मिशेल बॅचलेट यांनी दोन्ही बाजूंना भेट द्यावी. तिथली परिस्थिती पाहून रिपोर्ट तयार करावा. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे, सत्य काय ते जगाला समजू शकेल असे कुरेशी म्हणाले.

तणाव कमी करण्यासाठी द्विपक्षीय चर्चेची शक्यताच त्यांनी फेटाळून लावली. सध्याचे वातावरण आणि भारत सरकारची विचारसरणी पाहता द्विपक्षीय चर्चेची शक्यता वाटत नाही असे मत कुरेशी यांनी नोंदवले. अमेरिकेचा प्रभाव लक्षात घेता त्यांची भूमिका महत्वाची राहू शकते असे कुरेशी म्हणाले.