भारतातील शेतकरी आंदोलनावर पाकिस्तानी अभिनेत्याचं ट्विट, म्हणाला…’

0
300

पाकिस्तान, दि.१४ (पीसीबी) : तीन नव्या शेतकरी कायदांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीमध्ये मोदी सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाने भारत बंदही पाळला आणि या बंदला विविध राज्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. सत्ताधारी पक्षातील नेते मात्र या शेतकरी आंदोलनात राजकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप सातत्याने करताना दिसत आहेत. काही सत्ताधारी नेत्यांनी तर या आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी किंवा तत्सम लोक असल्याचाही आरोप केला आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानावर प्रचंड टीका करण्यात आली. अशा परिस्थितीत आज पाकिस्तानच्या एका अभिनेत्याने भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केलं आहे.

“भारतात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा मनापासून पाठिंबा आहे. तसेच मला भारतातील शेतकऱ्यांबद्दल नितांत आदर आहे”, अशा आशयाचं ट्विट पाकिस्तानी अभिनेता हामझा अली अब्बासी याने केले आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते कि, “सध्या सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? ते षडयंत्र यशस्वी होणार नाही समजल्यावर आता शेतकऱ्यांना उचकवलं जात आहे. सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे.” मात्र अशातच फक्त इतर देशातूनच नाही तर पाकिस्तान मधून सुद्धा या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या बाजूने पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय.