भाजप नेते रावसाहेब दानवे यांची राष्ट्रवादीच्या यात्रेवर जहरी टिका; धनंजय मुंडेंनी असा केला पलटवार

0
570

पुणे, दि. २९ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रा आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या यात्रांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चांगलेच आरोप – प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. या यात्रेदरम्यान भाजपनेते रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रेतांची यात्रा अशी उपमा दिली आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील त्यांच्यावर पलटवार केला आहे.

धनंजय मुंडे या उपमेला उत्तर देताना म्हणाले की, ‘रावसाहेब दानवेजी तुम्ही बरोबर बोललात. भाजप-सेनेच्या जुलमी, असंवेदनशील, शेतकरीविरोधी सरकारची ही अंतिम यात्रा आहे. पण तुमची एक चूक दुरुस्त करतो. या हुकूमशाही सरकारला शेवटचा नमस्कार करण्यासाठी लोक महाजनादेश यात्रेला गर्दी करत आहेत. रावसाहेब दानवे हे आपल्या गावरान भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. जालना इथल्या महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर इरसाल भाषेत भाष्य केले. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर राष्ट्रवादीच्या यात्रेची प्रेतयात्रा म्हणून खिल्लीही उडवली. तसेच राष्ट्रवादीच्या या यात्रेकडे परकीयांसोबत स्वकियांनीही पाठ फिरलवल्याची जहरी टीका केली आहे.