भाजप नेते जिल्हाध्यक्ष वसीम बारी यांची वडील, भावासह हत्या

0
411

जम्मू, दि, ९ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमधील बंदीपोरा येथील माजी भाजप जिल्हाध्यक्ष वसीम बारी तसेच त्यांचे वडील आणि भावाची हत्या करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली आहे. वसीम बारी यांच्या सुरक्षेसाठी आठ सुरक्षा रक्षक तैनात होते पण घटनेच्या वेळी ते उपस्थित नव्हते असं दिलबाग सिंह यांनी सांगितले. या सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सने दिली आहे. रात्री नऊ वाजता ही घटना घडली. वसीम यांच्या दुकानाबाहेर काही अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात त्यांचे वडील बशीर बारी आणि भाऊ उमर सुलतान हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांचंही निधन झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

बंदीपोऱ्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बशीर अहमद यांनी सांगितलं की जेव्हा तिघांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी वसीम बारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तरुण भाजप नेत्याच्या निधनामुळे आपल्याला अतोनात दुःख झालं असं राम माधव यांनी म्हटलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी देखील वसीम बारी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. त्याचा गुन्हा फक्त इतकाच होता की त्याने हातात तिरंगा घेतला होता असं त्यांनी म्हटलं आहे.