भाजप आमदार राम कदम यांना ‘त्या’ वादग्रस्त विधानाबाबत खेद

0
1326

मुंबई, दि. ५ (पीसीबी) –  विरोधकांनी माझे वक्तव्य अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण केला आहे. आदल्या दिवशी पत्रकार दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी काहीही आक्षेप घेतला नाही, कारण त्यांनी पूर्ण संभाषण ऐकले होते, असे सांगत भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी क्लिप व्हायरल केली त्यात मी थांबलो आहे, पॉज घेतला. त्यात एका दर्शकाने प्रतिक्रिया दिली, त्याला मी उत्तर दिले. माझे बोलणे संपल्यावर मी पुढे असेही म्हटलो होतो की प्रत्येक घरातली आई, मुलगी, बहिण हे लक्ष्मीचे रूप आहे तिचा मान सन्मान करा ते कोणीही का व्हायरल केले नाही? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. मी जे बोलले त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राम कदम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे त्यांनी म्हटले होते. हे विधान वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राम कदम यांच्यावर हल्ला चढवला आहे. तर मनसेने बॅनरबाजी करत राम कदम यांच्या विधानाचा निषेध केला. मनसेने घाटकोपरमध्ये आणि मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॅनर लावले आहेत.