भाजपाला मोठा दणका, तृणमूल सोडून गेलेले खासदार-आमदारसुध्दा स्वगृही

0
249

कोलकाता, दि. १७ (पीसीबी) – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकामध्ये भाजपाने मागील निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली असली तरी सध्या राज्यात भाजपासमोरील अडचणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बंगाल भाजपाचे दिग्गज नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपाचे इतर आमदार आणि नेतेही रॉय यांच्या पावलावर पाऊल ठेवत तृणमूलमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुकूल रॉय सतत बंगाल भाजपाच्या आमदारांबरोबरच खासदारांसोबतही संपर्कात आहेत. निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा स्वगृही म्हणजेच तृणमूलमध्ये परततील असा अंदाज व्यक्त केला जातेय. यामध्ये अनेक नेते असे आहेत ज्यांनी मुकुल रॉय यांच्यासोबत तृणमूल सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेला.

‘घरवापसी’चे प्रयत्न सुरु?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकुल रॉय यांनी स्वत: आपण भाजपा आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. तृणमूलमध्ये आल्यानंतरही मुकुल रॉय हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच बंगाल भाजपामधील काही मोठी नावं तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होतील असं सांगितलं जात आहे. २०१७ साली भाजापामध्ये गेलेल्या मुकुल रॉय यांनी मुलगा शुभ्रांशूसोबत पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केलाय. मुकुल रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी लवकरच मुकूल रॉय यांना पक्षातील एखादी मोठी जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं आहे.

२०२४ च्या निवडणुकीवरही होईल”
मुकुल यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे कमीत कमी २५ ते ३० आमदार आणि २ खासदार लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने जे काही केलं त्याचं उत्तर देण्याची वेळ आलीय. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या वडिलांवर खूप दबाव होता. याच कारणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. आपल्या प्रकृतीसंदर्भातील तक्रारींमुळे मुकुल रॉय हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी झाले नव्हते, असंही शुभ्रांशू यांनी सांगितलं.

भाजपाचे २५ आमदार आणि २ खासदार तृणमूलमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर पक्ष सतत आपल्या नेत्यांच्या संपर्कात आहे. भाजपाच्या नेत्यांनी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी पावले उचलली जात आहेत. कोणत्याही नेत्याने पक्ष सोडून विरोधी पक्षात सहभागी होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळेच भाजपा सध्या स्वत:च्या सर्व आमदार आणि नेत्यांवर नजर ठेऊन आहे. मागील काही काळापासून पक्षाच्या संपर्कात नसणाऱ्या आमदारांवर विशेष लक्ष दिलं जात आहे. विरोधी पक्ष नेते शुभेंदु अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यापालांची भेट घेतली त्यावेळी अनुपस्थित असणाऱ्या आमदारांवरही भाजपा लक्ष ठेऊन आहे.