भाजपाने नितीश कुमारांना दिला मोठा झटका; सहा आमदारांनी केला भाजप प्रवेश

0
233

अरुणाचल प्रदेश, दि.२५ (पीसीबी) : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीश कुमार यांच्या सहा आमदारांना फोडलं आहे. भारतीय जनता पार्टीने एनडीएमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला मोठा झटका दिला आहे. अरुणाचलमध्ये जदयूचे सात आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदारांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

पंचायत व महापालिका निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर ही माहिती समोर आली आहे. पीपुल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए) चे लिकाबाली मतदारसंघातील आमदार करदो निग्योर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

तर, रमगोंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे हेयेंग मंग्फी, ताली येथील जिकके ताको, कलाक्तंगचे दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिला येथील डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकु मतदारसंघातील कांगगोंग टाकू यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जदयूने २६ नोव्हेंबर रोजी सियनग्जू, खर्मा आणि टाकू यांना पक्ष विरोधी कार्यावाही केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती व त्यांना निलंबीत देखील केले होते.