भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार

0
751

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला असून देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक घोषणा करत पुन्हा एकदा नवा डाव खेळला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथविधी घेणार आहेत. तब्बल ५० आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार येत आहे. उध्दव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला हा पहिलाच जबरदस्त मोठा धक्का आहे.

फडणवीस आणि शिंदे हे आज दुपारी राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले. अनेकांना असेच वाटत होते की फडवणसी हे मुख्यमंत्री आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. प्रत्यक्षात उलटे घडले असून शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस हे सरकारबाहेर राहणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा ठाणे जिल्ह्याला हे पद मिळणार आहे.

राज्यपाल अॅक्शन मोडवर: ठाकरे सरकारला पहिला झटका
फडणवीस यांच्या या घोषणेने राजकीय वर्तुळाला धक्का बसला आहे. आज केवळ एकटे शिंदे हेच संध्याकाळी शपथ घेणार आहेत. भाजपचे 106, शिंदे गट आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आज राज्यपालांना देण्यात आले. या सरकारला माझे पूर्ण सहकार्य राहील आणि या सरकारला यशस्वी होण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.