भाजपला यश का मिळते?; शरद पवारांनी उलगडले गुपित

0
719

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचा भाग म्हणून पवारांनी आज (गुरूवार) भोसरीत पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाहीत, पण जे चांगले आहे, ते घ्यायला हवे. ही चिकाटी आपल्या कार्यकर्त्यांनीही शिकावी,  असा  सल्ला  पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

भाजपला यश का मिळते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कसा प्रचार करतात, याचे गुपित पवारांनी कार्यकर्त्यासमोर उलगडून सांगितले.  भाजपला यश का मिळते हे सांगताना संघाच्या या कार्यशैलीबाबत मला एका भाजप खासदारानेच माहिती दिली होती, असेही पवारांनी यावेळी आवर्जून सांगितले.

पवार म्हणाले की, संघाचे स्वंयसेवक पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि यातील एक घर बंद असेल, तर ते संध्याकाळी पुन्हा त्या बंद घरात जातात. संध्याकाळीही ते घर बंद असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरात जातात, पण काहीही झाले तरी ते त्या घरातील सदस्यांशी संपर्क साधतातच.   ही त्यांची  चिकाटी आपल्या कार्यकर्त्यांनीही शिकावी, असे पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची पद्धत  सांगताना पवार म्हणाले की, पक्षाचे निवेदन प्रत्येकाच्या हाती पोहोचेल,  यावर स्वंयसेवक  भर देतात.  असा शिस्तबद्ध कार्यकर्ता पक्षासाठी उपयुक्त असतो. यातून आपण   शिकले पाहिजे, असे पवारांनी  सांगितले.

आजपासून पदाधिकाऱ्यांनी  प्रत्येकाला जो भाग वाटून दिला आहे त्या भागातील नागरिकांशी संपर्क साधावा, घरोघरी भेट द्यावी. मतदारांकडून सविस्तर माहिती घ्यावी. यामुळे मतदार असे म्हणणार नाही की निवडणुकीतच तुम्हाला आमची आठवण येते का?, असे शरद पवारांनी सांगितले.