भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या वतीने राज्यभर जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महामेळाव्यास पिंपरी-चिंचवडमधून दहा हजारहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार आहेत. त्याचे नियोजन सध्या भाजपचे पदाधिकारी करत आहेत.

येत्या सहा एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा वर्धापनदिन असून, या वर्धापनदिनी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व मंत्री, आमदारांपासून ते सरपंचांपर्यंतचे राज्यभरातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवडमध्येही जोरदार तयारी सुरू आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर महामेळाव्याची जबाबदारी सोपविली आहे.

पिंपरी-चिंचवडमधून दहा हजारहून अधिक कार्यकर्ते महामेळाव्याला उपस्थित राहतील, याचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी विभागवार जबाबदारी दिली आहे. आता प्रभागनिहाय बैठकाही सुरू होणार आहेत. त्यात शहरातून किती कार्यकर्ते महामेळाव्यास जाणार, त्यांचे जाण्याचे नियोजन केले जाणार आहे.